इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखाना म.फुलेनगर सहयोग-ओंकार शुगर लिमिटेड (युनिट नं. ११, बिजवडी) या कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक कंत्राटदारांचे पैसे आणि कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने रयत क्रांती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे जनरल मॅनेजर तावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
१ जानेवारी २०२६ पासून कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. नियमानुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना कारखान्याने अद्याप ही रक्कम अदा केलेली नाही.
गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची (शेतकऱ्यांची) बिले देखील थकीत आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे गेल्या अनेक महिन्यांचे पगार रखडलेले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
रयत क्रांती संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे की, वरील सर्व थकीत रकमा तातडीने देण्यात याव्यात. जर २० एप्रिलपर्यंत यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास कारखाना प्रशासनाविरोधात कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी कारखाना प्रशासन जबाबदार असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार इंदापूर आणि इंदापूर पोलीस स्टेशन यांना देखील माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या