रस्ता दिसावा म्हणून लाईट लावतात की समोरच्याला आंधळं करण्यासाठी.?दापूर शहरात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर बसविण्यात येणाऱ्या अतितीव्र निळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या "चायना एलईडी" लाईटमुळे सर्वसामान्य वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे काही क्षण रस्ता दिसेनासा होतो आणि अपघाताला निमंत्रण मिळते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नंबर प्लेटचा फाँट बदलला, आकार बदलला किंवा नियम मोडले म्हणून तत्काळ कारवाई करणाऱ्या संबंधित यंत्रणांना रस्त्यावर दिवसरात्र डोळे दिपवणाऱ्या या प्रखर लाईट दिसत नाहीत का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे, इंदापूरातील काही गॅरेज आणि वाहन अॅक्सेसरी दुकानांमध्ये अशा नियमबाह्य एलईडी लाईटची खुलेआम विक्री व बसविण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा दुकानांवर धाडी टाकून नियमबाह्य बल्ब जप्त करावेत आणि विक्रेते तसेच वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
"रस्ता दिसावा म्हणून लाईट लावतात की समोरच्याला आंधळं करण्यासाठी?" असा उपरोधिक प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
वाहतूक नियम हे केवळ नंबर प्लेटपुरते मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक बाबीवर समान कठोर कारवाई झाली, तरच अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पण्या