अकलूजमध्ये भीषण पाणीटंचाई; बंद बोरवेल व हातपंप तातडीने सुरू करण्याची मागणी,नवीन बसस्थानक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण पालखीपूर्वी पूर्ण करण्याचेही निवेदन
अकलूज : आरोग्यदूत तथा माळशिरसचे आमदार मा. रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवक किरण बाबा गायकवाड यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना विविध नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात अकलूज शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी नगरपरिषद हद्दीतील बंद अवस्थेतील सर्व हातपंप व बोरवेल तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच नवीन बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने वाहतुकीसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आगामी पालखी सोहळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून भाविक व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जनसेवक किरण बाबा गायकवाड यांनी केली.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत नगरपरिषद प्रशासनाने या दोन्ही मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
टिप्पण्या