महिला सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषद सज्ज; मंत्री अदिती तटकरे व सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची महत्त्वपूर्ण चर्चा.
महिला व बालकल्याण योजनांना मिळणार गती; मंत्री अदिती तटकरे व सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची भेट.
इंदापूर प्रतिनिधी : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबाबत तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण व सर्वांगीण विकास यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी नव्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी दिली.
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी मा.आदितीताई तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच पुणे जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी आश्वस्त केले.
“महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून अधिक व्यापक उपक्रम राबविण्यात येतील,” असे सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
—————
टिप्पण्या