इंदापूर :- शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मिशन लाईफ' आणि राज्य सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील व्यंकटेशनगर परिसरात आयोजित विशेष 'स्वच्छता मोहिमेच्या' प्रसंगी ते बोलत होते. या पालिकेने शहराला देशपातळीवर आघाडीवर नेण्यासाठी हे कंबरकसून नियोजन केले आहे.
इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये, स्वच्छ इंदापूर ! सुंदर इंदापूर !! हरित इंदापूर !!!"या त्रिसूत्री संकल्पनेतून विविध प्रभागांमध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यंकटेश नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान श्री बालाजी मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, शिकलकर बोळ, तहसीलदार कार्यालय रोड तसेच व्यंकटेश नगरातील विविध रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. अनेक दिवस साचलेला कचरा, साचलेली घाण आणि वाढलेली झाडाझुडपे पूर्णपणे हटवून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारे फलकही यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष भरतभाऊ शहा यांनी सांगितले की, "शहरातील प्रत्येक प्रभागात नियमित स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार असून नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घ्यावा. स्वच्छता ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय शहर पूर्णपणे स्वच्छ व कचरामुक्त होऊ शकत नाही. 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' आणि 'माझी वसुंधरा मध्ये आपल्या इंदापूर शहराचा डंका वाजवण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून देणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीतच टाकावा, एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा आणि आपला परिसर हरित ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणात पुढाकार घ्यावा," असे जाहीर आवाहन त्यांनी केले.
या प्रभावी स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त करण्यात आले. अनेकांनी नगर परिषदेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत करत नियमितपणे अशा मोहिमा राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते आणि धार्मिक स्थळे स्वच्छ व सुंदर राहिल्यास नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.
या भव्य अभियानात इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतभाऊ शहा, मुख्याधिकारी रमेश ढगे, नगरसेविका मयुरी फ्रशांत उंबरे, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, नगरसेवक उमेश मखरे, नगरसेविका दीप्ती स्वप्नील राऊत, सामाजिक कार्यकर्ते वशिम बागवान, जावेद शिकलकर, प्रशांतमामा उंबरे तसेच नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी, मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष साफसफाईमध्ये सहभाग घेतला व "स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर" चा नारा दिला
टिप्पण्या