इंदापूर,:- पावसाळा तोंडावर आला की शासकीय पातळीवर नालेसफाई आणि पाणी वाहून जाण्यासाठी 'पावसाळापूर्व कामांची' लगबग सुरू होते. पण पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या भलताच 'सांस्कृतिक आणि व्यापारी' प्रयोग पाहायला मिळतोय. महामार्गावरून पाणी सुसाट वाहून जावे म्हणून काढलेल्या साईड चाऱ्या (गटारे) महाभागांनी चक्क गायब केल्या आहेत. होय, गायब! रस्ता कडेच्या काही अपवादात्मक ढाबेवाल्यांनी, पेट्रोल पंप मालकांनी आणि हॉटेलचालकांनी आपल्या ग्राहकांच्या गाड्या आरामात लागाव्यात म्हणून या चाऱ्यांवर चक्क माती आणि मुरूम टाकून त्या बुजवून टाकल्या आहेत.
आता हॉटेलमध्ये 'स्पेशल मटण थाळी' किंवा 'चिकन हंडी' ओरपायला येणाऱ्या गिऱ्हाइकांना गटारावरून उडी मारत कसं आणणार? हा विचार करून या चालकांनी 'आपला विकास, हायवेचा विनाश' हे धोरण राबवलेलं दिसतंय. पण यामुळे येत्या पावसाळ्यात महामार्गावर 'जलतरण तलाव' तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासकीय अधिकारी अॅक्शन मोडमध्ये!
या गंभीर प्रकाराची दखल सरडेवाडी टोलनाक्यावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, ज्या ज्या बहाद्दरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या नैसर्गिक पाण्याच्या चाऱ्या बुजवल्या आहेत, त्यांनी त्या स्वतःहून 'जैसे थे' म्हणजेच पूर्ववत करून घ्याव्यात.
"पावसाळ्यात हायवेवर पाणी साचून अपघात झाले तर त्याला हे ढाबेवाले जबाबदार असणार का? आम्ही महामार्गाचे काम करत असताना जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल."
हॉटेलमध्ये चमचमीत खाऊ घालणाऱ्या चालकांनो, प्रशासनाने जर कारवाईचा 'झणझणीत तडका' दिला तर सगळा मसाला उतरून जाईल! त्यामुळे टोलनाक्याच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वीच बुजवलेल्या चाऱ्या मोकळ्या करा, नाहीतर पावसाळ्यात तुमच्याच हॉटेलसमोर पाणी साचून ग्राहक थेट 'बोट' घेऊनच आत यावे लागेल, एवढं नक्की!
टिप्पण्या