इंदापुरात ‘स्क्रिप्टेड गुन्हेगारी’चा महाधमाका! "तक्रारी तयार करा, गुन्हे लावा आणि वसुली करा"; कोर्टाच्या आदेशाने ‘खाकी’ आणि ‘झारीतील शुक्राचार्यांचे’ धाबे दणाणले!
चित्रपटात दिग्दर्शक जशी स्क्रिप्ट लिहितो, तशीच काहीशी 'क्राईम स्क्रिप्ट' इंदापुरात लिहिली जात असल्याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे! प्रतिष्ठित नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवायचे, पुरावे प्लांट करायचे आणि मग दबावाचे राजकारण करायचे... असा हा इंदापूर पॅटर्न! पण म्हणतात ना, "कायद्याचे हात लांब असतात", अखेर इंदापूर न्यायालयाने या ‘स्क्रिप्टेड’ प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांच्या चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. चं. बारटक्के यांनी दिलेल्या या दणक्यामुळे इंदापूरच्या पोलीस वर्तुळात आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची कथा २०१८ पासून सुरू होते. इंदापूर शहरातील नामांकित क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक गोरख भोसले यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विडाच जणू तत्कालीन एपीआय महेंद्र निंबाळकर यांनी उचलला होता. यासाठी त्यांनी औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अव्वल कारकून 'झेंडे' यांना व्हॉट्सअॅपवर चक्क तयार तक्रारीचा नमुना (स्क्रिप्ट) पाठवला!
झेंडे यांनी या खोट्या खेळाचा भाग होण्यास आणि तक्रार देण्यास साफ नकार दिला. मग काय? 'सिंघम' स्टाईलने राग काढत झेंडे यांच्यावरच दुसरा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड धाडण्यात आले आणि त्यांचे निलंबनही झाले.
जामिनावर सुटल्यानंतर झेंडे यांनी 'सत्यमेव जयते'चा मार्ग धरला. त्यांनी संपूर्ण घडामोडींची कुंडलीच गोरख भोसले यांच्यासमोर मांडली. इतकेच नाही तर एपीआय निंबाळकर यांनी पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेज, निंबाळकर आणि त्यांचे कथित पार्टनर-इन-क्राईम 'अतुल भोसले' यांच्यातील फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग असलेला मोबाईलच भोसले यांच्या स्वाधीन केला.
या डिजिटल पुराव्यांच्या आधारे गोरख भोसले यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयानेही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांना संबंधित कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्स हस्तगत करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादी पक्षाचे वकील अॅड. राहुल मखरे यांनी, *"हा निरपराध लोकांना अडकवणाऱ्यांच्या थोबाडीत मारलेली मोठी चपराक आहे,"* असा थेट टोला लगावला आहे.
या प्रकरणाला आणखी एक मजेशीर आणि तेवढाच संतापजनक फाटा फुटला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, हे कथित अतुल भाऊ मोठे अजब रसायन आहेत. पोलीस अधिकारी आपले वैयक्तिक ऐकत नाहीत म्हणून त्यांच्याविरोधातच प्राधिकरणाकडे खोट्या तक्रारी करायच्या, हा यांचा छंद!
एका दुसऱ्या एपीआय अधिकाऱ्याविरुद्ध त्यांनी पैशांची तक्रार केली होती. पण जेव्हा तो अधिकारी एकाच लायब्ररीत अभ्यास करत असल्याचा विषय निघाला, तेव्हा या महाशयांनी गुपितच फोडले. ते म्हणाले, अहो, अशी तक्रार केल्याशिवाय माझी कामं केली जात नाहीत, माझी दखल घेतली जात नाही; म्हणून मला तक्रारी कराव्या लागतात. तुम्ही म्हणाल तर मी लेखी देऊन तक्रार मागे घेतो!"*
इंदापूर तालुक्यात सध्या 'सामाजिक कार्यकर्ते' नावाचा मुखवटा घालून फिरणाऱ्या काही टोळ्यांचा हा मोठा उद्योगच बनला आहे. लोकांवर 'जातीवाचक खोट्या केसेस' दाखल करायच्या आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर 'अर्थकारण' (वसुली) करायचे, हा धंदा तेजीत सुरू आहे.
पण आता या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सुत्रधार, म्हणजेच झारीतील शुक्राचार्य"रडारवर आला आहे. याच शुक्राचार्याने इंदापूरमधील एका माध्यम प्रतिनिधीवर आणि शेजारील गावातील दोन-तीन लोकांवर खोट्या जातीवाचक केसेस करायला लावल्याची कुजबूज आहे
टिप्पण्या