अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे टाकळी हाजी परिसरात शेतीचे मोठे नुकसान; सरपंच दामू अण्णा घोडे यांची पंचनाम्यासाठी धाव
टाकळी हाजी:
टाकळी हाजी, होणेवाडी, साळवेंद, घोडे वस्ती, थोरात वस्ती, भैरवनाथ वाडी आणि भाकरीवाडी या परिसरात आज झालेल्या अचानक अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे डाळिंब, केळी आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी गाईंचे गोठेही उद्ध्वस्त झाले आहेत.
## सरपंचांकडून तातडीने पाहणी आणि सूचना
नुकसानीची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे आदर्श सरपंच श्री. दामू अण्णा घोडे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार साहेब, सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी दादा यांच्याशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
## शेतकऱ्यांना आवाहन
सरपंचांनी परिसरातील सर्व प्रभावित शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीचे फोटो पंचनाम्यासाठी काढून सुरक्षित ठेवावेत, जेणेकरून शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यास मदत होईल.
टिप्पण्या