इंदापूर :प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांनी सन 1990 च्या दशकामध्ये ग्रामीण पत्रकारितेला ओळख निर्माण करून दिली, त्याचबरोबर ग्रामीण पत्रकारितेचा दर्जाही उंचावला. तसेच त्यांनी ग्रामीण पत्रकारितेला महत्त्व प्राप्त करून दिले. प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील माझा मित्र हरपला आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 62 ) यांचे सोमवारी (दि.13) दुपारी पुण्यात निधन झाले.
प्रकाश भोईटे यांची सन 1995 च्या सुमारास मी कृषी राज्यमंत्री असताना ओळख निर्माण झाली. त्यावेळी असलेल्या ठराविक पत्रकारांमध्ये ते अभ्यासू व उत्साही पत्रकार होते. ग्रामीण भागातील पत्रकारितेची व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती होती, त्यातूनच त्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम प्रभावीपणे केले, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
प्रकाश भोईटे यांनी लिहिलेल्या राजकीय बातम्यांचा मथळा लक्षवेधी असे. शेतकरी आणि पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेत अनेक आंदोलने केली. ग्रामीण जनतेचे प्रश्न ते जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडून ते सोडवून घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. ग्रामीण प्रश्नांबरोबरच कृषि, सहकार, साखर कारखानदारी आदी विषयावरही त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावी लिखाण केले, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
टिप्पण्या