इंदापूर शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार दि. २७/०२/२०२६ रोजी इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या वेळी नगराध्यक्ष श्री भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ श्री. बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते श्री अनिल पवार व सर्व सदस्य तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांनी आपले मनोगत मांडताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्न् वाढ यास अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी, श्री रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी अपेक्षीत उत्पन्न स्रोत व विकास कामांचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती दिली.
इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने सन 2025-26 या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. कोणतीही कर वाढ नसलेला रुपये 74,72,686/- शिलकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये मागील वर्षाची शिल्लक रु. 1,17,54,086/- असून सन 2026-27 मध्ये अंदाजे महसूली व भांडवली जमा रु 178,49,45,000/- अपेक्षित जमा धरणेत आलेली आहे. तसेच महसूली व भांडवली खर्च रुपये 178,92,26,400/- अपेक्षित धरण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत इंदापूर शहरासाठी नवीन भुयारी गटार योजना तसेच रस्ते प्रकल्प योजना मंजूर असून, त्या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. नगरपरिषदेचा स्वहिस्सा या अनुषंगाने निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यात नियमानुसार महिला बालकल्याण, दिव्यांग, दुर्बल घटक, तसेच क्रीडा महोत्सव यासाठी विशेष राखीव निधीची तरतूद केली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, संगणकीकरण यासह नागरी सुविधा केंद्र अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने तरतूद. तसेच शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेऊन, प्रस्तावित शहर विकास आराखडा विचारात घेऊन नवीन रस्ते, नगरपरिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारती साठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
सदर सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सर्व सदस्यांनी सविस्तर चर्चेनंतर मांडण्यात आलेल्या तरतुदी व शिफारशीसह सर्वानुमते मंजूर केला. शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
टिप्पण्या