(दि. १२ डिसेंबर २०२५)*
आज दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री , गृहमंत्री, समाजभूषण, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
सामान्य कार्यकर्त्यांपासून राजकारणाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला. विदर्भ–मराठवाडा–महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ते नेहमीच ओळखले गेले.
गोपीनाथ मुंडे साहेबांचे व्यक्तिमत्त्व जमिनीवरचे नेतृत्व, निर्णयक्षम वृत्ती, कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि निर्धार यासाठी प्रसिद्ध होते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिलांचे प्रश्न त्यांनी सदैव अग्रक्रमाने हाताळले. जनता दरबार, घरदार मोहीम, साखळी उपोषणे अशा माध्यमातून त्यांनी जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला.
ऊसतोड कामगारांच्या हालअपेष्टा आणि स्थलांतरित जीवनाची वेदना ओळखून त्यासाठी ठामपणे लढणारे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. साखर पट्ट्यातील हजारो कामगारांचा आवाज बनवून त्यांनी मजूर दर, सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला. वंचितांची बाजू घेणारा नेता म्हणून ऊसतोड कामगार आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते आजही अतूट आणि प्रेरणादायी मानले जाते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ,ग्रामविकास मंत्री तसेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, VJNT च्या मुलां- मुलींसाठी आश्रमशाळा, साखरशाळा,विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह,महिला सबलीकरण, पायाभूत सुविधा यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. केंद्रात त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व्यापकपणे राबवून देशातील लाखो गावांना जोडण्याचे काम गतीमान केले. गोपीनाथ मुंडे आणि भगवानगड यांचे अतिशय घट्ट, भावनिक आणि श्रद्धेच नातं होतं. राजकारणात प्रवेश झाल्यापासून प्रत्येक मोठ्या निर्णयापूर्वी, निवडणुकांपूर्वी व दसरा मेळाव्याला ते भगवानगडावर जात असत.संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतं.भगवानगड त्यांच्या आयुष्यातील "ऊर्जा स्थान" असल्याचे ते म्हणत. "भगवानगड माझी गुरुभूमी". माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असलेल्या लोकनेते मुंडे साहेबांनी अनेकदा सांगितले की, "माझं राजकारण ,माझी ताकद आणि माझा प्रवास भगवानगडामुळे शक्य झाला". समाजकारणात भगवानगडाचा प्रभाव, भगवानगडाच्या उपदेशातून समाजातील गरिबी, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, शिक्षण या विषयावर मोठ्या प्रमाणात कार्य घडले. लोकनेते मुंडे साहेब स्वतःही या विचारसरणीने प्रेरित असून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला गती दिली.
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब दरवर्षी न चुकता दसरा मेळाव्याला हेलिकॉप्टरने भगवान गडावर जायचे. संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मेळाव्याला आलेल्या मायबाप जनतेला संबोधित करायचे आणि उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायचे. तीच ऊर्जा मायबाप जनता बरोबर घेऊन जायची आणि ती ऊर्जा त्यांना पुढच्या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्यापर्यंत टिकून राहायची, दसरा मेळाव्याचा पायंडा साहेबांनी समाजाला घालून दिला. लोकनेते मुंडे साहेब हयात असेपर्यंत दसरा मेळावा भगवान गडावरच व्हायचा . परंतु पुढे त्यांच्या कन्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी साहेबांचा वसा आणि वारसा सुरु ठेवण्यासाठी.संत भगवान बाबांच्या जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट ता. पाटोदा जि.बीड या ठिकाणी भक्ती- भगवानगडाची उभारणी करून दसरा मेळावा सुरु केला.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त १)त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आठवण.
२)त्याग, साधेपणा व कार्यनिष्ठेची प्रेरणा.
३) ग्रामीण विकासासाठीची वचनबद्धता.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्याची आजच्या दिवशी आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
*लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!*
*शब्दांकन* :
*इंदापूर जि. पुणे*
टिप्पण्या