इंदापूर:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीसोबत पूरक उद्योग उभारणे ही काळाची गरज असून, ‘सोनाई परिवाराने’ दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
इंदापूर ते बारामती पालखी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त नितीन गडकरी यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील ‘सोनाई डेअरी’च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने व प्रविणभैय्या माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्प परिसराची पाहणी करताना गडकरी यांनी दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी सहभाग, दूध प्रक्रिया व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती याबाबत विशेष समाधान व्यक्त केले.
दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली सोनाई परिवाराने परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायाशी जोडून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ, महिलांना रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण भागात उद्योगाची निर्मिती या माध्यमातून सोनाई परिवाराने सामाजिक बांधिलकी जपल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना नितिन गडकरी यांनी भविष्यातील विकासाचा मंत्रही दिला. “आगामी काळ हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे उद्योगांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी,” असे ते म्हणाले. स्वतःची वीज स्वतः निर्माण करणारे प्रकल्प भविष्यात अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच इथेनॉल निर्मितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “इथेनॉल हे भविष्यातील स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. शेतीमालावर आधारित उद्योगांनी इथेनॉल निर्मितीकडे वळल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल आणि देशाच्या इंधन आयातीवरील अवलंबित्वही कमी होईल.”
सोनाई परिवारानेही गडकरी यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत भविष्यात सौर ऊर्जा, इथेनॉल आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये कार्य करण्याची तयारी दर्शवली. ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक उद्योग यांचा संगम घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीमुळे सोनाई डेअरीच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी दुग्ध व्यवसाय किती प्रभावी ठरू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, हरिश्चंद्र माने, विष्णूकुमार माने, प्रविण माने, अतुल माने आणि किशोर माने उपस्थित होते.
टिप्पण्या