नामांकित महाविद्यालयात 'राडा'; कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची आणि मारहाण, प्रशासनाकडून सत्यशोधन समिती नियुक्त!
-नेहमी ज्ञानाचे धडे देणाऱ्या विद्यामंदिरात चक्क 'शाब्दिक चकमक' आणि 'धक्काबुक्की'चा थरार रंगल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे. एका नामांकित महाविद्यालयात नुकताच असा काही प्रकार घडला की, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे.
प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक यांना फ्री स्टाईल मारहाण करत असतील तर विद्यार्थ्यांनी यातून काय बोध घ्यावा आणि विद्यार्थ्यांना तुम्ही कसे शिक्षण देत आहात याचा सर्वसामान्य माणूस नक्की विचार करेल म्हणून प्राध्यापकांनी सामाजिक जाणीव ठेवून कार्य करण्याचे भान ठेवणे आवश्यक आहे
केवळ नावापुढे 'प्राध्यापक' किंवा 'अधीक्षक' लागल्याने माणूस सुसंस्कृत होत नाही. खरी पदवी ही तुमच्या वर्तणुकीतून दिसते. जर उच्चशिक्षित लोक रस्त्यावरच्या गुंडांसारखे वागत असतील, तर त्यांच्या पुस्तकी ज्ञानाची किंमत शून्य आहे.
ताकद दाखवण्यासाठी हात उचलण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे शब्दांचे आणि कायद्याचे बळ नसते, तेच सहसा हिंसेचा आधार घेतात. वादावर चर्चेने मात करणे हाच सुशिक्षितपणाचा खरा मार्ग आहे.शिक्षक हे समाजाचे आरसा असतात, पण जर आरसाच तडा गेलेला असेल, तर त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहू नका. चुकीच्या कृत्यांचे समर्थन कधीही करू नका
महाविद्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हिंसक वादामुळे खळबळ उडाली आहे. महाविद्यालय परिसरातच झालेल्या या बाचाबाचीचे पर्यवसान चक्क मारहाणीत झाल्याने शैक्षणिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी महाविद्यालयाच्या आवारात ही घटना घडली. यामध्ये शैक्षणिक, कार्यालयीन आणि सेवक वर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामुळे महाविद्यालयाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महाविद्यालयाच्या आदर्श परंपरेला काळीमा फासणाऱ्या या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.
या घटनेच्या सखोल चौकशीसाठी महाविद्यालय प्रशासनाने तातडीने एक सात सदस्यीय 'स्वतंत्र सत्यशोधन समिती' नियुक्त केली आहे. ही समिती महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक ॲक्ट २०१६ आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार या प्रकरणाचा तपास करणार आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत
सदर समितीला आपला अहवाल येत्या १८ मे २०२६ पर्यंत बंद पाकिटात प्राचार्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाविद्यालयासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारची वर्तवणूक निंदनीय असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. आता या सत्यशोधन समितीच्या अहवालात नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या