इंदापुरात शिक्षणाचे बाजारीकरण: खासगी शिकवण्यांचे फुटले पेव ! पालकांच्या खिशाला कात्री; ‘कोचिंग’च्या विळख्यात अडकले विद्यार्थ्यांचे बालपण
काही वर्षांपूर्वी केवळ १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असलेले क्लासेस आता थेट बालवाडीपासून सुरू झाले आहेत. इंदापूर शहरातील मुख्य रस्ते असोत किंवा अंतर्गत गल्ल्या, प्रत्येक ठिकाणी कोचिंग क्लासेसचे मोठमोठे फलक पाहायला मिळतात. "शंभर टक्के निकालाची हमी" आणि "भविष्यातील डॉक्टर-इंजिनिअर घडवणारी संस्था" अशा जाहिरातींचा मारा करून पालकांना भुरळ घातली जात आहे.
शाळेची भरमसाठ फी भरल्यानंतरही मुलाला खासगी क्लासला लावणे ही आता पालकांसाठी गरज नसून एक 'स्टेटस सिम्बॉल' बनले आहे.
फीची लूट: सामान्य कोचिंग क्लासची फी १० ते २० हजारांपासून सुरू होऊन, नीट (NEET) आणि जेईई (JEE) सारख्या परीक्षांसाठी ती लाखांच्या घरात जात आहे.
अवांतर खर्च: नोट्स, सराव परीक्षा आणि 'क्रॅश कोर्स'च्या नावाखाली पालकांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात आहेत.
अनेक मोठ्या शाळा आणि खासगी क्लासेस यांचे 'साटेलोटे' असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. काही शाळांमध्ये नावापुरतेच शिक्षण दिले जाते आणि विद्यार्थ्यांना ठराविक क्लासेसला जाण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रवृत्त केले जाते. यामुळे शाळा केवळ हजेरी लावण्याचे ठिकाण बनली असून, खरे शिक्षण खासगी क्लासच्या चार भिंतीतच मिळत असल्याचा समज बळावला आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणारा विद्यार्थ्यांचा प्रवास रात्री ८ वाजेपर्यंत शाळा आणि क्लासच्या चक्रातच अडकलेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी किंवा अवांतर आवडीनिवडी जोपासण्यासाठी वेळच उरत नाहीये. या वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आणि मानसिक तणावाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शिक्षणाचा मूळ उद्देश ज्ञानार्जन असला पाहिजे, मात्र आता तो केवळ व्यवसाय झाला आहे. प्रशासनाने या वाढत्या क्लास संस्कृतीवर आणि त्यांच्या अवांतर फीवर नियंत्रण मिळवणे
गरजेचे आहे, एक जागरूक पालक, इंदापूर.
आता प्रश्न उरतो तो इतकाच की, इंदापूरचे हे 'शैक्षणिक हब' विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे की केवळ नफा कमावण्याचे साधन बनले आहे? यावर शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.पण कारवाई करण्यात कुचराई होत आहे,गोलमाल है.भाई गोलमाल है..
वरमायच शिंधळ आसल्यावर व-हाडाला बोलून काय फायदा..
टिप्पण्या