इंदापूर शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या दि. 16 ते 30 नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्याचा ऊस बिलाचा पहिला हप्ता हा विना कपात प्रती टन रु. 3101 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारी (दि.15) जमा करण्यात आला आहे, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याने उच्चांकी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यापूर्वी दि. 1 ते 15 नोव्हेंबर या पंधरवड्यातील ऊस बिलाची रक्कम रु. 3101 प्रमाणे जमा करण्यात आली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या पंधरवड्याची ऊस बिल रक्कम प्रति टन रु. 3101 प्रमाणे सोमवारी (दि. 15) बँकेत जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चालु ऊस गळीत हंगामामध्ये 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्टीने कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरु असल्याची माहिती अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली.
सध्या कारखान्याचा चालू गळीत हा हंगाम उत्कृष्ट कार्यक्षमतेने सुरु असून, प्रतिदिनी ऊसाचे 5700 ते 6000 मे. टन या क्षमतेने ऊसाचे गाळप सुरू आहे. कारखान्याने आज मंगळवार अखेर 2,64,782 मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी-कर्मचारी वर्ग व हितचिंतक यांचे सौ.भाग्यश्री पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी सौ.भाग्यश्री पाटील यांनी पुढे सांगितले की, कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप केले जाणार असून, गाळपाअभावी एकही टिपरू ऊस शिल्लक राहणार नाही. आपल्याला कारखान्याचे 7 लाख.मे. टन उसाचे गाळप पूर्ण करावयाचे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी घाई करू नये. शेतकी विभागाकडून शिस्तबद्धरित्या ऊस तोडणी प्रोग्राम सुरू आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या गुणवत्तेच्या ऊसाचा पुरवठा कारखान्यास करावा, त्यामुळे आगामी काळात अधिकचा ऊस दर देणे शक्य होणार आहे, असे त्यानी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांनी सध्या अधिकच्या क्षेत्रावर ऊस लागणीकडे लक्ष देऊन, ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही सौ.भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
टिप्पण्या