पुणे, दि.२७ (जिमाका वृत्तसेवा): आज इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे इंद्रेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नागरी वस्तीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी उप नगराध्यक्ष भरतशेठ शहा, अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताठे, माजी नगरसेवक, व्यापारी व नागरिक आणि नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, इंदापूर शहर व परिसरात यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, याकरिता पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत नगरपरिषदेने तातडीने सविस्तर आराखडा तयार करावा. मान्सून काळात रोगराई पसरू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. संपूर्ण परिसरात साफसफाई राहील, याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
मुसळधार पावसाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. साचलेल्या अथवा वाहत्या पाण्यात उतरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.
0000
टिप्पण्या