*चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये उत्साहात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा – स्वयंसेवकांनी राबवली स्वच्छता मोहीम*
इंदापूर – दिनांक २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षा मार्फत सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छते पासूनच समृद्ध आरोग्याचा आरंभ होतो. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः युवकांनी या मोहिमेत पुढाकार घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले.
यानंतर NSS युनिट चे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसरात, प्रवेशद्वाराजवळ, उद्यान भागात तसेच आसपासच्या रस्त्यांवर झाडू मारून, कचरा गोळा करून स्वच्छतेचे कार्य हाती घेतले. या उपक्रमात स्वयंसेवकांनी "स्वच्छ भारत – स्वस्थ भारत" या संदेशा सह नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जन जागृतीही केली. परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देणारे फलकही या वेळी लावण्यात आले.
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संपूर्ण NSS विभागाचे स्वयंसेवक पूर्ण उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदानातून समाजसेवेचा आदर्श ठेवत परिसरात स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.
राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा आणि एकात्मतेची भावना अधिक बळकट झाली. यामुळे परिसरात स्वच्छतेबाबत एक सकारात्मक संदेश पसरला असून, नागरिकांमध्येही जागरुकता निर्माण झाली आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे चेतना फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळू बोराटे व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.
टिप्पण्या