*पुणे, १४ सप्टेंबर २०२५:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली *‘राष्ट्रवादी परिवार मिलन’* हा अभिनव उपक्रमाची सुरुवात आज हडपसर येथून झाली. पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचं नातं अधिक घट्ट व्हावं या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये करण्यात आले.
दिवसाची सुरुवात अजित पवार यांनी खडकी-केशवनगर पूल, मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळ येथील प्रशासनिक पाहणीतून केली.
त्यानंतर अजितदादांनी विविध भागांतील कार्यकर्त्यांच्या घरी थेट जाऊन संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी झाले. हडपसर, मुंढवा, केशवनगर, मांजरी, १५ नंबर चौक, सातववाडी, वानवडी, रामटेकडी, मगारपट्टा, हडपसर मार्केट, ससानेनगर, काळेपाडळ, चिंतामणी नगर-सय्यदनगर, मोहम्मदवाडी, कौसरबाग, लोअर कोंढवा, कोंढवा, अपर कोंढवा, कात्रज अशा परिसरांमध्ये राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रमाअंतर्गत विविध बैठका पार पडल्या
पारंपरिक राजकीय उपक्रमांपेक्षा वेगळ्या शैलीत, अजित पवार यांनी सकाळी सचिन गावडे यांच्या घरी नाश्ता, दुपारी दीपक तांदळे (एससी समाजातील कार्यकर्ता) यांच्या घरी जेवण, तर रात्री कात्रजमध्ये कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले. सोबतच सोमेश्वर भेळ, घाडगे मिसळ, कालिका डेअरी स्वीट्स, मधुजा प्युअर व्हेज, शिवाय टी हाऊस अशा नावाजलेल्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे जोरदार स्वागत केले. हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ नेतृत्वकेंद्रित पक्ष न ठेवता, कार्यकर्ताकेंद्रित आणि संघटन मजबूत करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरले आहे.
अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या शिवा शेवाळे यांच्यासह विविध ठिकाणी नविन कार्यकर्त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांचा उत्साह वाढवला. या उपक्रमाला कार्यकर्त्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अशा थेट संवादामुळे नवचैतन्य मिळाल्याची भावना व्यक्त केली.
प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी परिवार मिलन उपक्रमांतर्गत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या मेहतनीचे कौतुक केले आणि "एकत्रित राष्ट्रवादी परिवार" म्हणून एकजुटीने वाटचाल करण्याचा पक्षाचा संकल्प पुन्हा बळकट केला.
दिवसभर चाललेल्या या उपक्रमाचा यशस्वी समारोप कात्रज येथील स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांसोबत झालेल्या स्नेहभोजनाने झाला, ज्यामुळे राष्ट्रवादी परिवार मिलन मोहिमेची सुरूवात यशस्वी झाली आणि ही मोहीम लवकरच महाराष्ट्रातील इतर भागातही राबवली जाणार आहे.
टिप्पण्या