मुख्य सामग्रीवर वगळा

दिवंगत रत्नाकर(तात्या) मखरे यांच्या जन्मदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त *जीवनपट*

 इंदापूर नेतृत्व आणि वक्तृत्वाचा मिलाफ म्हणजेच तात्या. जाती धर्म बाजूला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके असतात. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे.मात्र शिव, फुले,शाहू, आंबेडकरी विचारांची कास धरून सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभावी वाटचाल करणारे व्यक्ती म्हणजे तात्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच राहिली. अनेक वर्षापासून नानाविध अध्यायांचा इतिहास,हृदय आणि श्वासांच्या नात्याइतका एकरुपतेने सामावला गेला आहे.
तात्यांची राजकीय जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने सन- १९७४ पासून इंदापूर नगरपालिकेत नगरसेवक निवडीने झाली.१२ डिसेंबर १९९० ला नगरसेवकांमधून नगराध्यक्षपदी तात्यांची निवड झाली. नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विधायक योजना राबविल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे नगरपालिका मैदानात बसविले . रोजंदारीवरील ३८ कामगारांना न्यायालयाच्या माध्यमातून कायम केले. पालिके शेजारी जि. प.शाळेला नवीन खोल्या बांधल्या. उद्योग धंद्यासाठी लोकांना गाळे काढून दिले.न पा. च्या तळ्यात स्विमिंग पुल बांधण्याची तात्यांची इच्छा होती. तसेच आधुनिक पद्धतीचा बगीचा बनविण्याचा संकल्प होता. परंतु ते स्वप्न अपूर्ण राहिले याची खंत तात्यांना नक्कीच राहिली. महाराष्ट्रातील नामांकित कारभार चालवणारे नगराध्यक्ष म्हणून तात्यांना बहुमान मिळाला. तात्यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गानी प्रचंड साथ दिली.हे सांगायला तात्या विसरले नाहीत.
तात्यांनी राजकीय जीवनात भाजपा मध्ये देखील काही काळ काम केले. पण त्यात ते रमले नाहीत.मा. एम. बी. मिसाळ (नाना) यांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भारतीय दलित पँथर मध्ये राजकीय सुरुवात झाली. आक्रमकतेने काम, आंदोलने उभारली. समाजासाठी काहीतरी वेगळं काम करण्याची तात्यांची तयारी असायची वेळप्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांशी घनिष्ठ संबंध आले. आठवले साहेबांनी तात्यांना महाराष्ट्रभर फिरवलं. दौरे झाले. घणाघाती भाषणं व्हायची. अन्यायाविरूद्ध लढतांना नवी ऊर्जा मिळायची . पुढे दलित पँथर जिल्हाध्यक्ष, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या तात्यांनी निडर पणे पार पाडल्या.
 तात्यांच्या भाषणाची सुरुवात बहुजन महापुरुषांची नावे घेऊन संथ गतीने होवून नंतर वीजेची दाहकता ओकत असलेल्या शब्दांत भाषण अनेक उदाहरणासह द्यायचे. शब्द व बोलणारे तात्या समजायला लागले.हजारो जीभांनी तात्यांची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे.मात्र मला जाणवलेले तात्या हे कुटुंबवत्सल होते.हळवे कवी मन व झुंजार कार्यकर्ते या त्यांच्या दोन बाजू होत्या.त्यांनी कधी काही दडवल नाही. खुल्लमखुल्ला मोकळेपणानं आरशासारखं स्पष्ट बोलायचे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्ट वक्ते, सार्वजनिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, प्रचंड इच्छाशक्ती, नाविन्याचा ध्यास घेणारे, आपल्या कार्य कर्तृत्वाने आपलेसे करणारे प्रेरणास्थान तात्या. दूरदृष्टीने झपाटून काम करणारं गतिमान नेतृत्व म्हणजे तात्या.. त्यांच्या सोबत काम करताना वेगळीच ऊर्जा मिळायची. तात्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर शिक्षण संस्थेला स्वतः च्या मालकीची ५.१/२ एकर जमीन वापरासाठी दिली आहे. त्याठिकाणी शाळेकरिता भव्य दिव्य अशी देखणी इमारत उभी आहे.१ली ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात. निवासी खोल्या मुला मुलीं साठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहेत.३६८ विद्यार्थी निवासी आहेत. अनिवासी विद्यार्थी शहरातून शिक्षणासाठी शाळेला येतात. शालेय संकुलाला तात्यांनी स्वतः च्या आई वडिलांचे नाव न देता बहुजन महापुरुष व महामातांची प्रत्येक विभागाला नावे देऊन तात्यांनी नवा आदर्श घालून दिला. त्या संपूर्ण परिसराला जिजाऊनगर हे नाव दिलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांनी घडवले. या दरम्यानच्या काळात राष्ट्रीय नेते श्री. शरदचंद्र पवार पवार साहेब यांचे अनेक वेळा संस्थेला सहकार्य लाभले. अनुदान वेळेवर न मिळाल्याने अडचणीच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी खूप मदत केली. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असताना तत्कालीन सरकारमुळे आश्रमशाळांना अनुदान देण्यास प्रचंड विलंब केला.दरम्यानच्या काळात इंदापूर तालुक्यात शेटफळगढे धरण उंची वाढविणे संदर्भात उद्धघाटन कार्यक्रम होता. त्यावेळी काटी ता. इंदापूर येथे त्यांची सभा होती. तात्यांनी विद्यार्थ्यांचा मोर्चा त्याठिकाणी नेला होता. मुंडे साहेब आमच्या मोर्चाला सामोरे आले. तात्यांनी अनुदानाची कैफियत मांडली. निवदेन मुंडे साहेबांनी स्वीकारलं. आणि मुंडे साहेब म्हणाले, मुलांच्या खाण्यापिण्याच्या अनुदानाचे पैसे रखडवणे चुकीचे आहे. तुम्ही काळजी करू नका. दोन दिवसात तुमचे अनुदान मिळण्याची मी व्यवस्था करतो. असे तात्यांना मुंडे साहेबांनी आश्वासन दिले. आणि खरोखर दोन दिवसात समाज कल्याण पुणे येथील अधिकारी अनुदानाचा धनादेश इंदापूरला घेऊन आले. अनुदानाचा धनादेश तात्यांकडे सुपूर्द केला. शिक्षणाशी ज्या पिढ्यांचा कधी दुरान्वये संबंध आला नव्हता, अशा पददलित,भटके विमुक्तांच्या, बहुजनांच्या नव्या पिढ्यांना त्यांनी केवळ सुशिक्षित केले नाही.तर बुध्द,कबीर, शिव,फुले, शाहू आंबेडकर या बहुजन महापुरुषांची दृष्टी दिली. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने तात्यांच्या शिक्षण संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले. संस्थेतील कर्मचारी वर्गाने देखील मोलाची साथ दिली त्यांचे सहकार्य लाभले हे सांगायला तात्या विसरले नाहीत. माध्यमिक आश्रमशाळा तात्यांना मिळणे कामी राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेवरून माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्य केले, त्याबद्दल तात्यांनी संस्थेच्या वतीने इंदापूर येथील दूधगंगा येथे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांचा येथोचीत सत्कार केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वडील दिवंगत शहाजी बापू पाटील यांचे तैलचित्र आश्रमशाळेत मोठा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत बसविणारे इंदापूर तालुक्यात एकमेव व्यक्ती तात्या आहेत. थोर स्वातंत्र्य सेनानी शाहीर नागसेन तथा जंगम स्वामी हे क्रांतिसिंह नानापाटील यांच्या कार्यकाळातील थोर सेनानी होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचाही खारीचा वाटा आहे. परंतु शाहीर जंगम स्वामी यांचा शासनाच्या वतीने कोणताच सन्मान झाला नाही. ते उपेक्षित राहिले होते. शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. तात्यांनी शाहीर जंगमस्वामी यांचा भिमाई आश्रमशाळा इंदापूर येथे १०१ वा. वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. त्यांच्या वृद्धापकाळात त्यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांना मदत केली. शासन दरबारी तात्यांनी पाठपुरावा करून शासनाकडून जंगम स्वामी यांना मदत मिळून दिली. तात्या एवढ्यावर न थांबता शाहीर जंगम स्वामी यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून मुलींच्या निवासी इमारतीला शाहीर नागसेन तथा जंगम स्वामी असे नावं देऊन एक वेगळा आदर्श ठेवला. 
तात्या त्यांच्या मर्जीनुसार जगताना 
 त्यांच्या जबाबदा-यांपासून ते कधी दूर गेले नाहीत. जनतेचे दुःख जपणारे, सत्यासाठी धडपडणारे, जनतेची वकिली करणारे ध्येयनिष्ठ, कार्यमग्न, बहुआयामी व्यक्तिमत्त्व, कार्यतत्पर, वक्तशीर, संघर्षशील, हसतमुख, कुटुंबवत्सल, संवेदनशील, स्पष्टवक्ते, शिक्षणप्रेमी व धुरंधर असे नेतृत्व म्हणजे तात्या. सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आला होता. तेथील लोकांचे अतोनात नुकसान झाले होते. लोक भयभीत होऊन मदतीसाठी याचना करत होते. तात्यांनी स्वतः व संस्थेतील कर्मचारी यांच्या वतीने १६ ऑगस्ट २०१९ रोजी ७५,०००/- रुपये किंमतीचे जीवन उपयोगी साहित्य पूरग्रस्तांना दिले.
गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात राज्यपातळी,जिल्हा पातळीवर सर्व सामान्य बहुजनांवर झालेल्या कायिक वाचिक हल्ल्याच्या विरोधात तात्यांचे देखणे शब्द तलवारी सारखे तळपले. त्यांनी आवाज उठवले म्हणून त्या वृत्तीनी डोके वर काढले नाही., हे तात्यांशी मतभेद असणारे सुध्दा मान्य करतील. तात्यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. प्रतिकूल परिस्थितीत खूप संघर्ष केला. तात्यांना त्यांच्या प्रत्येक प्रसंगात पत्नी शकुंतला मखरे (काकी) यांनी साथ दिली. कुटुंबातील सर्व सदस्यांचा साथ सहयोग असल्यानेच तात्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आपलं योगदान देता आलं. काम करता आलं. हे वास्तव आहे. कोरोना ह्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या बिकट परिस्थिती मध्ये गोरगरीब लोकांच्या हाताला काम नाही म्हणून उपासमारीची वेळ आली होती. तात्यांनी भिमाई आश्रमशाळेवर इंदापूर शहरातील आंबेडकरनगर, साठेनगर, होलारवाडा या भागातील लोकांना गहू,तांदूळ ह्या वस्तूंचे वाटप केले. कोणतीही गोष्ट प्रसिद्धी मिळावी म्हणून कधी केली नाही. गरीबीचे चटके त्यांनी स्वतः सोसले असल्याने गरिबीच्या व्यथा काय असतात हे तात्यांनी जवळून अनुभवलं आहे. म्हणून त्यांनी मदत करताना मागे पुढे पाहिले नाही. तात्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (ट्रस्ट) इंदापूरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरु करुन मोठा आदर्श ठेवला. पहिल्या शिवजयंतीला छत्रपती संभाजी महाराज यांना बोलावण्यात आले होते.
अशा किती तरी घटना, प्रसंग आहेत ज्यातून तात्यांचे वेगळेपण, साधेपणा, मोठेपण, कर्तृत्व दिसून येत राहिलं. कोरोना महामारीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याने शासनाने बऱ्याच योजनांवरील अनुदान देणे थांबवले होते. आश्रमशाळाचे अनुदान देखील थांबवले होते. ज्यांनी शाळेला उधारीवर माल दिला ते किराणा दुकानदार पैशासाठी तगादा लावू लागले. तात्यांनी ही सारी कैफियत तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कानावर घातली. तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांना ईमेलद्वारे वरील समस्या सांगितल्या. दादांच्या स्वीय सहाय्यकांनी दादांना आलेला ईमेल दाखवला अजितदादा पवार यांनी तात्यांना फोन करून सांगितले की, तात्या तुम्ही काळजी करू नका. तुमचा अनुदानाचा प्रश्न तातडीने मार्गी लावतो.तात्यांच्या नेतृत्वात आम्ही तब्बल ८२ दिवस अनुदानासाठी इंदापूर तहसील कचेरी समोर धरणे धरले.हे आपोआप असच घडत नाही. त्यासाठी मेहनत, कष्ट आणि पाठपुरावा केल्याशिवाय काहीही मिळत नाही असं तात्या नेहमी म्हणायचे . तत्कालीन सरकारने आश्रमशाळेला (मुला - मुलींना) मिळणारा रेशनिंगचा गहू ,तांदूळ बंद केला होता. तात्यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब यांना ईमेलद्वारे सदरची समस्या लिखित स्वरूपात पाठवली. पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून राज्याचे तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेबांना आदेशित केले. मग तो प्रश्न पवार साहेबांमुळे मार्गी लागला. कोणत्याही हार- तुऱ्याची अपेक्षा तात्यांनी कधीच ठेवली नाही. तात्यांकडून पाठीवर शाबासकीची थाप यापुढे कधीच मिळणार नाही. तात्यांची उणीव नेहमी भासेल.
दिवंगत तात्यांना अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त विनम्र अभिवादन ! (दि.९/७/२०२५)
*शब्दांकन* : *नानासाहेब सानप सर*
*भिमाई प्राथमिक आश्रमशाळा इंदापूर जि.पुणे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते