पुरंदर तालुक्यात नेहमीच चर्चेत असलेल्या वाल्हे येथील वरच्या मळ्यात जमिनीच्या जुन्या वादातून दोन जणांवर कोयत्याने हल्ला झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र पांडुरंग भुजबळ रा.वाल्हे ( वरचा मळा ) यांनी त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी पाणंद रस्ता नुकताच मंजूर करून घेतला होता.परंतु या रस्त्यासाठी रामचंद्र भुजबळ व गणेश जगन्नाथ भुजबळ यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून पूर्वीपासूनच वाद होता .
मात्र जुन्या वादाचा राग मनात धरून गणेश भुजबळ याने याच पाणंद रस्त्यावर दि.२३ जून रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान ट्रॅक्टर आडवा लावून रामचंद्र भुजबळ यांचा रस्ता अडवला.त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने रामचंद्र भुजबळ यांच्यावर वार करण्यास सुरवात केली.यावेळी ओंकार अरविंद पवार ( रा.आडाचीवाडी ) हे भांडणे सोडविण्यास गेले असता गणेश भुजबळ याने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले व रामचंद्र भुजबळ यांचा मुलगा श्रेयश भुजबळ याला देखील मारहाण केली.या घटनेत रामचंद्र भुजबळ व ओंकार पवार हे गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
यावेळी उपचारानंतर जखमी ओंकार पवार यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी गणेश भुजबळ याला अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे .या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नामदेव तारडे यांसह हवालदार प्रशांत पवार हे करीत आहेत.
टिप्पण्या