पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील कामठवाडी ( ता. पुरंदर) येथील करंज नाल्याजवळील एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला .मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.३० जून) रोजी सुरज दशरथ दुर्गाडे (रा. कामठवाडी) हे नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना करंज नाला शेजारील अंकुश दुर्गाडे यांच्या शेतातील ( गट क्र.५८७४) पाणी पुरवठ्याच्या विहिरी जवळ कुबट व दुर्गंधीचा उग्र वास आला .अशावेळी त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला.या घटनेची तात्काळ खबर त्यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून मयताचा पंचनामा केला असता मयत इसमाची उंची साडे पाच फूट रंग निमगोरा शरीरावर क्रीम कलरचा शर्ट काळ्या रंगाची विजार काळपट बनियान गळ्यात व कमरेला काळा करगोटा उजव्या हाताला लाल रंगाचा धागा तसेच करंगळी शेजारील बोटात धातूची अंगठी आढळून आली आहे.
या घटनेचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार भाऊसाहेब भोंगळे हे करीत आहेत.
टिप्पण्या