*इंदापूर : पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे. यातून सामाजिक ऐक्य, सर्व धर्म समभाव ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शालेय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शालेय वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यात विद्यार्थी विविध संतांच्या,वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले.विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते.विठ्ठल–विठ्ठल, ज्ञानोबा- माऊलीच्या गजरात विद्यार्थ्यांनी पालखीचा आनंद अनुभवला.
शिक्षक हिरालाल चंदनशिवे, नानासाहेब सानप यांनी वारी, दिंडीच्या परंपरेचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे(काकी),सचिव ॲड. समीर मखरे यांनी पालखीचे पारंपरिक पूजन केले.
विद्यार्थ्यांनी हाती भगव्या पताका फडकवित,टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा - माऊली तुकाराम असा नामघोष आणि पांडुरंगाचे नामस्मरण करीत प्रांगणात पालखी सोहळा पार पडताच,इंदापूर प्रमाणेच रिंगण करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी फुगड्या खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे / पताका ,तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून हे जणू पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांच्या नियोजन आणि संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांची दिंडी आषाढी एकादशी निमित्त उत्साहात संपन्न झाली.
टिप्पण्या