उजनी धरण पाणलोट क्षेत्र विविध रंगी बेरंगी पक्षी वैभवामुळे लवकरच पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाणार : उजनी परिसर व पक्षी अभ्यासक अरविंद कुंभार यांचे भाकित.
इंदापूर, डॉ. संदेश शहा.सन १९७० च्या दशकात सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी तसेच शेती बरोबर औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर साकारलेले उजनी धरण हे रंगबिरंगी पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरले आहे. उजनी जलाशय पाणलोट क्षेत्रात जलाशयाच्या काठावरील हिरवीगार पिकांचा आश्रय घेत परिसरात शेकडो प्रजातींचे देशी व विदेशी पक्ष्यांचा वावर वर्षभर पाहायला मिळतो. विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी उजनीला आपली पंढरी केली आहे. उजनी धरणाचा पसारा साधारण सात किलोमीटर रुंदी व दीडशे किलोमीटर लांबी असा आहे. पाण्यातील माशांसह इतर जलजीव व विस्तीर्ण काठावरील दलदल, चराऊ भागा तील मुबलक खाद्य हे पक्ष्यांसाठी पोषक असणारे वातावरण हे कारण पक्ष्यांच्या हितावह जीवनासाठी तसेच विणीच्या हंगामासाठी पोषक ठरतात. उजनीतील हे मिष्टान्नाची चव चाखण्यासाठी, विशेष करून हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात लक्षणीय संख्येने स्थलांतरित पक्षी येथील स्थानिक पक्ष्यांच्या सहवासात येऊन रमतात.
उजनी धरणावर येणाऱ्या पक्ष्यांपैकी स्थलांतरित असणारे मनमोहक रोहित ( फ्लेमिंगो ), श्वेत ब्लाक ( व्हाईट स्टाॅर्क ) या पक्ष्यांसह, पट्ट कदंब हंस ( बार हेडेड गूज ), चक्रवाक ( रूडी शेल्डक) व कलहंस ( ग्रे लॅग गूज) इत्यादी सुमारे वीसेक प्रकारचे बदकं दरवर्षी उजनीला आपलं माहेरघर करतात. करकोचा कुळातील सर्वाधिक प्रकारचे विविध करकोचे व 'वेडर्स' ( दलदलीच्या चिखलात चरणारा पक्षीवर्ग ) या ठिकाणी हजेरी लावत असल्या मुळे पक्षी अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधून असतात.
उजनी धरणाच्या यशवंत जलाशयाच्या विस्तृत पाणफुगवटांवर पाण्याच्या लाटांलहरींवर तरंगत मुक्त विहार करणारे पक्षी, मच्छी मारांच्या नौका, अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे विलोभनीय प्रतिबिंब पाहण्याची मजा काही औरच आहे. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी हजारोंच्या संख्येने पाणकावळे, काळे व पांढरे कुदळे, गायबगळे या पक्ष्यांच्या मोठ्या थव्याने आपल्या निवाऱ्याकडे परतताना घेतलेला गगनोड्डाण विलोभनीय वाटतो.
ऑक्टोबर ते मार्च - एप्रिल अखेर उजनीत क्षुधाशांतीसाठी दरवर्षी परदेशातून हमखास वारी करणारे व उजनी परिसरात प्रमुख आकर्षण असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे गगनभरारी पक्षी निरीक्षकांना अचंबित करतात. त्यांचा आकाशातील उड्डाण म्हणजे जलाशयातील पाण्याला लागलेले आग असा भास होतो. त्याचं कारण म्हणजे ते उडाले की त्यांच्या पंखाखाली नजरेस पडणारा लाल भडक रंग. या कारणा मुळे त्यांना अग्निपंख असं चपखल नाव दिलं आहे. एरवी श्वेत वर्ण ( रोहित ) परिधान करून उभारलेले हे फ्लेमिंगो उडाल्यावर लालभडक दिसतात म्हणजे हे निसर्गातील चमत्कारच म्हणावं लागेल!
शेकडो वर्षांपासून ज्वारी ( शाळू ) पिकाऊ क्षेत्रात हुरड्यावर डल्ला मारून उदरभरणा करण्यासाठी युरोप खंडातून लक्षावधी संख्येने भोरड्या ( गुलाबी मैना ) पक्ष्यांनी अलीकडच्या काळात धरणाच्या काठावरील झाडाझुडुपांचे आश्रय घेत मुक्कामाला येतात. भोरड्यांचे सायंकाळी विसाव्या अगोदर तथा सकाळी चरण्यासाठी निघण्या अगोदर आकाशातील सुमारे पंधरा मिनिटे हवाई कसरत पाहण्यासारखे असते. ज्वारीच्या सुगीच्या हंगामातील भोरड्यांचा या परिसरा तील वावर पक्षी निरिक्षकांना सुखावतो.
पावसाळा वगळता धरण परिसरात राज्यातून व राज्या बाहेरील वेगवेगळ्या भागांतून पक्षी निरीक्षक येथे येतात. विविध पक्षी पाहण्यासाठी येणारे अनेक पर्यटक किमान एकदा तरी नौकाविहार करतातच. नौकाविहार करण्याचा एक अविस्मरणीय अनुभव येथे येतो. तसेच अनेक तरूण मच्छीमार नौका विहार आणि पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देतात. विस्तीर्ण जलाशयामुळे जलविहार करण्यासाठी येथे मोठी संधी आहे. जलविहार करत जलाशयावरील पक्ष्यांच्या विलोभनीय कवायती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. विस्तीर्ण जलाशयात नौकाविहार, स्थलांतरित परदेशी पक्ष्यांच्या विलोभनीय हालचाली पाहणे तसेच जलाशय परिसरात मिळणारे झणझणीत माशांचे जेवण पर्यटकांसाठी आनंद देणारे आहे.
अफाट निसर्ग सौंदर्य व रंगीबेरंगी पक्ष्यांचा वावर असलेले उजनी धरण परिसर मात्र पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेले नाही. होडीवाले व मासेमारी करणारे व स्थानिक लोक उजनी परिसरात येणाऱ्या पर्यटक व पक्षी निरीक्षकांच्या मदतीला धावून येतात; मात्र याबाबतीत काहीच सुसंगता आढळून येत नाही. अनेक पर्यटक जलविहारासाठी नौकानयन करण्याचे पसंत करतात; मात्र नौका चालविणारे तरबेज असतातच असे नाही तसेच नौकेत जीव रक्षा सुरक्षित प्रणाली असतेच असे नाही. यातून अघटीत घटना घडण्याची शक्यता असू शकते. नौका चालविणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना तरबेज करण्याची गरज आहे. जलाशयाच्या काठावर ज्या ठिकाणी पक्ष्यांचा मोठा वावर आहे त्या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचे मनोरे उभे करणे, जागोजागी धरणाविषयी व परिसर संवर्धनाविषयी सूचना व जनजागृतीचे फलक लावण्याची गरज आहे. डिकसळ गावा जवळच्या रेल्वेच्या जुन्या पुलाजवळ शासनाने वनविभागाचे मध्यवर्ती कार्यालय स्थापन करून सक्षम अधिकारी व इतर कर्मचारी नेमून संपूर्ण जलाशय परिसराची निगा राखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. वाळू उपश्यावर शंभर टक्के पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, पक्ष्यांची शिकारी होऊ नये याची खबरदारी घेणे व रस्ते विकसित करणे या गोष्टींची सुविधा करून देणे इत्यादी बाबी पूर्ण केल्यास पर्यटनाला चांगला वाव मिळेल. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या धर्तीवर उजनी परिसर विकसित केल्यास भविष्यात उजनी जलाशयाची जागतिक स्तरावर ओळख होईल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल यात काही संदेह नाही. राज्य सरकारने अलीकडे उजनी धरण परिसराला पर्यटन ठिकाण जाहीर करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. या बद्दल शासन किती यशस्वी होईल यांच्या कडे पक्षीप्रेमींचे लक्ष असल्याचे डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.
दरम्यान पुणे, सोलापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेले उजनी धरण पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर आणण्यासाठी कुगाव च्या माजी सरपंच कोकरे यांचा मोठा पाठपुरावा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व सहकाऱ्यांनी पाऊले उचलली आहेत. त्यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्र पक्षी अभ्यासक तसेच पर्यटक यांना लवकरच पर्वणी ठरणार हे निश्चित आहे.
फोटो : डॉ. अरविंद कुंभार.
विविध पक्ष्यांचे नयनमनोहर फोटो.
टिप्पण्या