भारतीय निर्यातक्षम ज्वारीला ग्लोबल करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील : अमेरिका सोरघम युनायटेड फाउंडेशनचे सीईओ नेट ब्लूम यांचे शेतकऱ्यांना आश्वासन.
इंदापूर, डॉ. संदेश शहा.
शेतकरी हा जगाचा अन्नदाता बळीराजा आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तरच जग सुखी रहाणार आहे. भारतीय आहारात आरोग्यदायी ज्वारीला खूप महत्व आहे. त्यामुळे ज्वारीचे दैनंदिन आहारातील महत्व लक्षात घेऊन निर्यातक्षम भारतीय ज्वारीला ग्लोबल करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही अमेरिके तील सोरघम युनायटेड फाउंडेशनचे सीईओ नेट ब्लूम यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सोरगम युनायटेड फाउंडेशन, समृद्धी ऍग्रो ग्रुप आणि कृषी विभाग यांच्या कडून ज्वारीला ग्लोबल करण्याचे नियोजन करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील रामवाडी - वडापुरी येथे आयोजित एक दिवसीय मोफत कार्यशाळेत नेट ब्लूम बोलत होते. कार्य शाळेत तालुक्यातील पाच गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
नेट ब्लूम पुढे म्हणाले, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असून देशात शेती व्यवसायास अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जे पिकते, त्यापेक्षा बाजारपेठेत जे विकते ते पिकविण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे स्थानिक भारतीय ज्वारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यावेळी नेट ब्लूम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्वारी पिकाचे उत्पादन, महत्व व विविध देशा तील उत्पादकांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन करून ज्वारी पिकाला आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत मूल्यवृद्धी करुन स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने निर्यातक्षम ज्वारी क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान देण्या साठी संस्था अग्रेसर राहील असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली चे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर म्हणाले, इंदापूर तालुका हा एकेकाळी ज्वारीचे आगार होता. इंदापूर तालुक्यातील पूर्वीचे ज्वारीचे क्षेत्र व तसेच या पुढील काळात ज्वारी उत्पादक शेतकरी यांचे संघटन करून हा प्रक्रिया व्यवसाय वाढवला जाईल. प्रक्रिया उद्योग हाच शेतकऱ्याला किफायतशीर भाव देऊ शकेल असे स्पष्ट करत त्यांनी ज्वारीचे आहारा तील महत्व विशद केले.
अबुधाबी येथील गुंतवणूकदार श्रीमती ईव्ह यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा कशा पद्धतीने सोडविता येतील याची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची तयारी दाखविली. भारतात प्रथमच येऊन शेतकरी करत असलेल्या कामा वर खुश झालेल्या श्रीमती ईव्ह यांनी जगाला अन्न पुरविणारा शेतकरी सुखी करण्या साठी येणाऱ्या काळात शाश्वत प्रयत्न केले जातील अशी उपस्थित शेतकऱ्यांना ग्वाही दिली. शेतकऱ्यांना ज्वारी पिकातील नवीन तंत्रज्ञानासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
सोरघम युनायटेड फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. बामदेव त्रिपाठी म्हणाले, भरड धान्यांचे महत्त्व लक्षात घेता देशात या खालील क्षेत्र वाढले पाहिजे. यासाठी एकत्र येऊन निविष्ठा खरेदी, विक्री, प्रक्रिया अशी वेगवेगळी कामे केली पाहिजेत. मजूर समस्यावर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था निश्चित मदत करेल.
यावेळी समृद्धी ऍग्रो ग्रुप कंपनीचे संचालक तात्यासाहेब फडतरे यांनी ज्वारी पिकातील प्रक्रिया उद्योगातून तरुणांना उद्योगाच्या संधी याविषयी माहिती दिली. समृद्धी ऍग्रो ग्रुप ने गुड टू इट असा ब्रँड तयार करून विविध प्रकारच्या पदार्थ विषयी जागतिक बाजारपेठ मिळवली असल्याचे त्यांनी सांगितले. आशिष नागोरी यांनी ज्वारी पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी मार्गदर्शन करून ते एप्लिकेशन्स सहा महिन्यासाठी शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिले. यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी ज्वारी पिकासाठी राबविण्यात येणारे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान व विविध प्रकारच्या योजना या विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बावडा, वडापुरी, सुरवड, वकिलवस्ती, झगडेवाडी परिसरातील बहुसंख्य प्रगतिशील शेतकरी या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित होते. शेतकऱ्यांना किसान वज्र या शेतीविषयक मातीतील मूलद्रव्य, पाणी व्यवस्थापन, पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, पाऊस व हवामान बदल याविषयी माहिती देणाऱ्या ॲपची माहिती देण्यात आली. हे ॲप शेतकऱ्यांना समृद्धी ऍग्रो ग्रुप व सोरघम युनायटेड यांनी मोबाईलवर पुढील सहा महिन्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले. अश्या पद्धतीच्या प्रशिक्षण कार्यशाळा सातत्याने व्हाव्यात अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी कार्यक्रमा नंतर व्यक्त केली.
टिप्पण्या