उजनी धरण पाणलोट क्षेत्रात प्रशासनाने धडक कारवाई करून सिने स्टाईलने अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच बोटींचा पाठलाग करून या बोटींना उडवून जल समाधी दिली. त्यामुळे वाळू माफियांना चाप बसला आहे. मात्र जोपर्यंत वाळू माफियांचा चेहरा प्रशासन उघड करत नाही, तोपर्यंत वाळू उपसा थांबणार नाही. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण ताकद लावून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा बुरखा फाडून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. प्रशासनाने यासंदर्भात नुरा कुस्ती न करता चितपट कारवाई करून उजनी पाणलोट क्षेत्रातील जैव वैविध्य वाचवावे असे नदी काठच्या नागरिकांचे म्हणणे आहे.
दि.२० मार्च २०२५रोजी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या ५ बोटीं पकडल्या. त्या सर्व बोटी उडवून बुडवून नष्ट करून त्यांना जल समाधी दिली.
सदर कारवाई मध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार विजय घुगे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, भूषण सुरवडकर, महसूल सहाय्यक बाळासाहेब मोहिते, इंदापूर तालुक्या तील पोलीस पाटील सुनिल राऊत, प्रदीप भोई व अरुण कांबळे तहसील कर्मचारी संग्राम बंडगर, महसूल सेवक मिलन पवार, अविनाश कुंभार, अविनाश फडतरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील द्रोण सर्वेअर संकेत बाबर यांनी भाग घेतला.
दरम्यान राज्य शासनाचे नवीन वाळू धोरण आठवडाभरात घोषित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र अवैध वाळू उपशावर तहसील व पोलीस यांच्या संयुक्त कारवाई बरोबरच संबंधित ग्रामपंचायतीना देखील कारवाईत सहभागी करून घेतले तरच अवैध उपश्याला कायम स्वरुपी लगाम बसेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या