इंदापूर:- छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय,' असे म्हणत आपण शिवजयंती साजरी करतो. जल्लोषी मिरवणूकही काढतो; मात्र त्यातून शिवसंदेश घरोघरी पोहोचवतो का, असा सवाल करत छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा डोळसपणे अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक, निवृत्त सनदी अधिकारी, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. विधात्याने औरंगजेबसारख्या पाप्याला 89 वर्षांचे आयुष्य दिले; मात्र शिवरायांना केवळ 18 हजार 306 दिवसांचे आयुष्य दिले. परमेश्वराने आपल्या भूमीवर अन्यायच केला. मात्र, अवघ्या 49 वर्षांच्या या आयुष्यातही चार-चार शतके पुरेल इतका महापराक्रम त्यांनी केला. आणखी दहा वर्षांचे जरी आयुष्य मिळाले असते, तरी छत्रपती शिवरायांनी भीमा, निराकाठची घोडी, इंग्लंड आणि फ्रान्सच्या समुद्रकाठी नाचवली असती, असे सांगत, शिवरायांचे रूप आठवावे, प्रताप आठवावा, त्यांचे चरित्र विवेक पद्धतीने तरुणांत साठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.युगपुरुष छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा आणि जाज्वल्य इतिहास विविध प्रसंग व संदर्भांसह आपल्या खास शैलीत उलगडला. एका बखरीत शिवरायांचे 22 गुरू सांगितले. मात्र, शहाजीराजे हेच शिवरायांचे महागुरू होते, असे सांगत पाटील म्हणाले, खरे शहाजीराजे आपल्याला कधी शिकवलेच नाहीत. त्यांची वृत्ती स्थिर नव्हती, असे सांगितले जाते. मात्र, लाखोंच्या फौजेसमोर लढणारा शूरवीर, भातवडीच्या युद्धात प्रथम गनिमी कावा वापरणारे शहाजीराजे कधी शिकवले नाहीत.इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना विश्वास पाटील बोलत होते.ते पुढे बोलताना म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराज निसर्गपुत्र होते, असे सांगत पाटील म्हणाले, त्यांना नदी, डोंगर, वाटा-पायवाटा यांची माहिती होती. याचा त्यांनी स्वराज्य उभारणीत उपयोग केला. छत्रपती शिवरायांची दिव्यद़ृष्टी पारखी होती. शिवराय एक व्यक्ती नसून, त्यांच्या अंगी आठ माणसे काम करीत होती. त्यांनी तानाजी मालुसरे यांच्यासारखे अनेक सरदार घडवले. नेताजी पालकर हे त्यापैकी एक पेटता निखारा होते.
छत्रपती शिवराय हे अष्टावधानी होते, ते इस्लामविरोधी नव्हते, अनेक मुस्लिम सरदारांनी छत्रपती शिवरायांना मदत केली, असे सांगत पाटील म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचा राजकारण्यांनी चलती नाणे म्हणून वापर केला आहे. या वेळी गटनेते कैलास कदम, सुनील गलांडे, माजी सरपंच वसंत मोरे, गोपिचंद गलांडे,प्रा.अशोक मखरे सर, संदिपान कडवळे,इनायतअली काझी, रमेश पाटील,हमिदभाई आतार, महादेव चव्हाण, प्रशांत शिताप, अशोक अनपट, सह इतर मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन संतोष नरूटे यांनी तर आभार शरद झोळ यांनी मानले. या कार्यक्रमाचे प्रायोजक- नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शहा ब्रदर्स इंदापूर
टिप्पण्या