*सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी ( सीसीएमपी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरण्याची परवानगी, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या नेतृत्वात मोठा विजय,*
महाराष्ट्र राज्यातील ज्या नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी ( सीसीएमपी ) हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे, त्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा महाराष्ट्र वैद्यकिय परिषद अधिनियम १९६५ अन्वये वैद्यक व्यावसायिक म्हणून व्याख्येत समावेश करून त्यांना आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकिय व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी प्रशासनातील सर्व विभागीय सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त व औषध निरीक्षक यांना परिपत्रक जारी केले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियम १९०५ मधील २ ईई नुसार
सीसीएमपी नोंदणीकृत डॉक्टरांना घाऊक किंवा किरकोळ विक्रेते ऍलोपथिक औषधांची विक्री करू शकतात तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे देखील देण्याचा आदेश परिपत्रक व्दारे देण्यात आला आहे. त्यामुळे
सीसीएमपी नोंदणीकृत डॉक्टरांच्या लढ्यास यश आले आहे. यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा विजय संपादन करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत डॉक्टरांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोषात केले.
महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल च्या प्रयत्नाने व मा.ना.अजितदादा पवार यांच्या राजकीय इच्छाशक्ती मुळे सन २०१४ मधे महाराष्ट्र वैद्यक परिषद अधिनियम व महाराष्ट्र समचिकित्सा अधिनियम यात दुरुस्त्या करून राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना आवश्यक तिथे एलोपथिक औषधोपचार करता यावे या करिता एक वर्ष कालावधीचा सीसीएमपी अभ्यासक्रम चालू करण्यात आला. अभ्यासक्रम चालू होऊन आठ वर्षात काही हजार डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु अन्न व औषध अधिनियम मधील कलम २ ईई नुसार या डॉक्टरांना पेशंट साठी औषधे खरेदी करण्यात व लिहून देण्यात कायदेशीर अडचणी येत होत्या. सीसीएमपी कोर्सच्या यशस्वी निर्मिती वेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या प्रशासकपदी असलेल्या डॉ. बाहुबली शहा यांची शासनाने पुनश्च ऑक्टोबर २०२४ मधे प्रशासक पदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी अजितदादा, तत्कालीन मंत्री धर्मराव अत्राम, तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष व विद्यमान मंत्री मा. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या सहकार्याने मा. डॉ. रजनीताई इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कमिटी सदस्य बाळासाहेब पवार, नितीन गावडे व सुधीर म्हात्रे यांच्या सह राज्याचे औषध नियंत्रक मा. गहाने साहेब व उपायुक्त मा. संतोष काळे साहेब यांच्याशी बैठका आयोजित करून त्यांना सर्व कायदेशीर वस्तुस्थिती कागदपत्रां सह त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ही सर्व वस्तुस्थिती मान्य करून सहकार्य केले. आचारसंहिता समाप्ती व मंत्रिमंडळ स्थापना झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचे हक्क बहाल करणारे परिपत्रक जारी केले. या निर्णयाचे डॉ. बाळासाहेब पवार,
डॉ. नितीन गावडे यांच्या सह हजारो डॉक्टरांनी स्वागत करून शासन, प्रशासन तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांना धन्यवाद दिले.
राज्यात ९० हजार होमिओपॅथिक डॉक्टर असून पैकी २४ हजार हून जास्त डॉक्टरांनी उपरोक्त अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ग्रामीण भागातील होमिओपॅथिक डॉक्टरांवर रुग्णसेवेची मदार आहे. त्यामुळे मागील नागपूर अधिवेशनात सर्व होमिओपॅथिक संघटनांनी एकत्र येत उपोषण केले होते. त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, नंदकुमार गावित यांनी घेतली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या मागणीने वेग घेतल्यामुळे सरकारने त्याची दखल घेवून योग्य कार्यवाही करण्यास सुरुवात केली. त्यानंतर निवडणुका होवून भाजप, शिवसेनेचे सरकार सुरू झाले. या कालावधीत सीसीएम पी अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
या निर्णयामुळे ज्या गावात आरोग्य सेवा नाही, त्या गावात आरोग्य सेवेचे सक्षमी करण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.
मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य संघटनेने या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हा निर्णय औट घटकेचा ठरतोय का हा निर्णय इतर राज्यांना सर्वांना आरोग्य देण्यासाठी मार्गदर्शक ठरतोय याकडे विविध वैद्यकिय शाखांचे तज्ञ, संघटनांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या