उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला : डॉ. रावसाहेब पाटील.
उद्योग व्यापारातील सचोटी, नीतिमूल्ये, गुणवत्ता आणि विश्वास जयकुमार पाटील यांनी जपला. सोलापूरच्या औद्योगिक विश्वातील जयकुमार पाटील हे कोहिनूर हिरा होते असे प्रतिपादन पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ. रावसाहेब पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुबई शाखा सोलापूर आणि मंगळवेढेकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थांच्या वतीने सोलापूरचे उद्योगपती जयकुमार कलगौंडा पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे औचित्य साधून सोलापूरा तील उद्योग आणि व्यापार या विषयावर डॉ. रावसाहेब पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.
डॉ. रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर आंतरिक प्रेरणा महत्वाची असून त्यासाठी लागणारी दूरदृष्टी अनुभवातून समृद्ध होत असते. सचोटी, गुणवत्ता, विश्वासार्हता,परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास हे गुण
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असतात. बाजारपेठेचा आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा डोळे आणि कान उघडे ठेवून बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत हिशोबी आव्हाने स्वीकारली तर कोणतीही व्यक्ती उद्योगपती होऊ शकते असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. जगात फुकट काही मिळत नाही, उद्योग सुरू करा, तुमचे अनुभव, कल्पना, श्रम दुसऱ्या उद्योगपतीला किंवा कंपनीला मोठे करण्यासाठी वापरू नका. स्वतःच्या लहान उद्योगाला मोठे करण्या साठी वेळ, कल्पना आणि खर्च करा. भारत हा जगातील मोठा देश असून भविष्यात उद्योजकांसाठी हा देश पर्वणी ठरणार आहे. लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक स्व.जयकुमार कलगोंडा पाटील यांनी उद्योग व्यापारातील नीतिमूल्ये जपली, धनाचा मोठेपणाचा हव्यास त्यांनी कधी केला नाही, ग्राहक आणि कामगार वर्गात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात ते यशश्वी झाले. सोलापूर शहरातील पहिली होटगी रोड येथील एमआयडीसी निर्माण करण्यात त्यांचे वडील कलगौंडा पाटील तर चिचोली एमआयडीसी निर्मितीत जयकुमार पाटलांचे योगदान उल्लेखनीय आहे. सोलापूरचे औद्योगिक वैभव निर्मितीसाठी नव उद्योजकानी जयकुमार पाटील यांच्या जीवन कार्याचा आदर्श घेवून सोलापूरचे औद्योगिक विश्व महाराष्ट्रात समृद्ध करावे असे आवाहन शेवटी डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका प्रा. सविता वैद्य यांनी तर वक्ते डॉ. पाटील यांचा परिचय प्रा. स्नेहल पाठक यांनी करून दिला. समाजशास्त्राच्या अभ्यासक,लेखक दत्ता गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरची भूमिका स्पष्ट केली तर सरफराज शेख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दिनेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मंगळवेढेकर मॅनेजमेंट कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या