*इंदापूर शहर व तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत. प्रमुख तिन्ही उमेदवारांनी आपल्या कुटुंबासह मतदान करत केला विजयाचा दावा !*
इंदापूर विधानसभा मतदार संघात सायंकाळी पाच वाजे पर्यंत सुमारे ६४.४४ टक्के मतदान झाले असून अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा होत्या. रात्री उशिरा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार इंदापूर तालुक्यात ७६.१० टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत ७६.३४ टक्के मतदान झाले होते. यंदा मागील निवडणुकीपेक्षा मतदानात पॉईंट २४ टक्के घट झाली आहे. तरी देखील या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. त्यामुळे मतदान कुणाला तारणार व कुणाला पाडणार यासंदर्भात खमंग चर्चा सर्वत्र रंगली असून इंदापूर येथे धक्कादायक निकाल लागेल अशी सर्वत्र चर्चा आहे. नेते आता निकालासाठी घड्याळाकडे पहात आहेत तर कार्यकर्ते विजयासाठी तुतारी सज्ज ठेवत आहेत तर काही कार्यकर्ते किटली तील गरम चहा देवून निकालाची वाट पहात आहेत !
दरम्यान विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी आपल्या कुटुंबासह मतदान करून विजयाचा दावा केला.
दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी येथे पत्नी सौ. सारिका, पुत्र
श्रीराज, सर्व बंधू तसेच कुटुंबीयांसह मतदान केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली विकासकामे, सहकारी पक्षांची त्यास मिळालेली साथ तसेच सर्व सामान्य जनतेचा मिळालेला प्रतिसाद यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला. शिरसटवाडी येथे आमदार भरणे यांची तेथे उपस्थित विरोधी नेते व कार्यकर्ते यांच्याशी शाब्दिक चकमक झाली.
हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे पत्नी सौ. भाग्यश्री, पुत्र राजवर्धन तसेच कन्या सौ. अंकिता पाटील ठाकरे यांच्या सह मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पारंपरिक मते, त्यास महाविकास आघाडीचे सर्व पक्षांनी दिलेली साथ, आपली पारंपरिक मते लक्षात घेवून आपला विजय निश्चित असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला.
प्रविण माने यांनी रुई येथे पत्नी सौ. मयुरी, बहीण तेजश्री, वडील दशरथ माने , चुलते हरिकाका व विष्णू कुमार माने तसेच आपल्या कुटुंबा समवेत मतदान केले.
यावेळी लोकशाहीत जनता जनार्दन श्रेष्ठ असून जनतेने परिवर्तन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा प्रविण माने यांनी केला आहे.
इंदापूर तालुक्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ ५.०५ टक्के, अकरा वाजेपर्यंत १६.२० टक्के, दुपारी १ वाजे पर्यंत २९.५० टक्के, ३ वाजे पर्यंत ४९.५० टक्के, पाच वाजेपर्यंत ६४.४४ टक्के तर सहा वाजेपर्यंत ७६.१० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी जीवन सरवदे यांनी दिली. दरम्यान सायंकाळी सहा वाजेपर्यंत कालठण नंबर एक मध्ये मोठ्या रांगा असल्याची माहिती पत्रकार काकासाहेब मांढरे व नितीन दीक्षित यांनी दिली. मतदान प्रक्रिया सुरू असताना लाखेवाडी येथे एका वर हल्ला करण्यात आला. हल्ला झालेला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा असल्याचे समजते. इंदापूर शहरात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती नीला शरदकुमार शहा यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मतदान केले. यावेळी हुमड जैन फेडरेशन चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, पत्नी सौ. संगीता शहा, कन्या डॉ. सुश्मिता शहा, चिरंजीव दर्शन शहा यांच्या समवेत मतदान केले. नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, शहा ग्लोबल स्कूल चे विश्वस्त मुकुंद शहा, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, उद्योजक अंगद शहा व शहा परिवाराने इंदापूर येथे मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप
गारटकर यांनी आपल्या कुटुंबासह इंदापूर येथे मतदान केले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकासकामा वर निश्चित विजयी होतील. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिळालेली साथ महत्त्वाची असल्याने ते विजयाची हॅटट्रिक करतील असा विश्वास प्रदीप गारटकर, विधीज्ञ सचिन राऊत, अतुल झगडे यांनी व्यक्त केला.
यंदा जनतेने परिवर्तन करायचे ठरविले असल्याने नको आजी व माजी, आम्हाला हवा आहे नवीन बाजी या तत्त्वानुसार प्रविणभैय्या माने विजयी होवून इतिहास घडवतील असा विश्वास बापू जामदार, अमोल मुळे विकास खिलारे यांनी व्यक्त केला.
लोकसभेप्रमाणे यंदाची निवडणूक जनतेने हाती घेतली होती. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांचे आशीर्वाद लाभले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यंदा विजयाची शंभर टक्के हॅटट्रिक करतील अशी खात्री कैलास कदम, सागर मिसाळ, शेखर पाटील, गोरख शिंदे, डॉ. रियाज पठाण, विधीज्ञ आशुतोष भोसले यांनी दिली.
टिप्पण्या