वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वराचे दर्शन घेऊन श्रींची विधिवत पूजा करत महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. तसेच गणपतींची आरती करून श्रीफळांचे तोरण अर्पण करण्यात आले. यावेळी देवस्थानच्या वतीने महावस्त्र व श्री मयुरेश्वर यांची प्रतिमा देऊन डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेहलम जोशी, सुरेंद्र जेवरे शिवसेना जिल्हाप्रमुख यांसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी या सर्वांना सुरक्षित आणि चांगलं जीवन मिळावं यासाठी प्रार्थना केली. तसेच मयुरेश्वराने याआधी अनेक संकल्प पूर्ण केलेले आहेत जे राहिले आहेत ते देखील लवकरच पूर्ण व्हावेत अशी गणराया चरणी प्रार्थना केली. याखेरीज राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनतेने निवडणूक आयोगाला सहकार्य करावे. निवडणूक आयोगाने देखील नागरिकांना योग्य सोयीसुविधा मिळण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या