पुणे, दि. २४: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या पुणे दौऱ्यात राजभवन येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, कला, खेळ आदी घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकास विषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक असलेली विकास कामे, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीशी संबंधित बाबी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, कायदा व सुव्यवस्था आदी प्रमुख विषय मांडण्यात आले. तसेच उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगांच्या समस्या, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास यासारखे विषय मांडण्यात आले.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.
या संवाद चर्चेसाठी साहित्य, नाट्य, दिग्दर्शन, सामाजिक कार्य आदींशी संबंधित मान्यवर ज्यामध्ये सतीश देसाई, रामदास फुटाणे, मोहन कुलकर्णी, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदार, शांताराम जाधव, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त स्मीता शिरोळे, तृप्ती मुरगुंडे, ऑलिम्पिकपटू अंजली भागवत, मनोज पिंगळे, बाळकृष्ण आकोटकर आदी तसेच उद्योग व वाणिज्य संघटनांचे प्रमुख, जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टिप्पण्या