*चांदणी चौक दिगंबर जैन मंदिर मध्ये दशलक्षण महापर्व निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा, उपवास व्रतीं ची शोभायात्रा तसेच पारणे सोहळा संपन्न*
पुणे चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये, दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण महापर्व विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाले.
या पर्वाची बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी षोडषकारण व्रता पासून सुरूवात होवून बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावाणी या कार्यक्रमाने दशलक्षण धर्मपर्वाची समाप्ती मोठ्या उत्साहात पालखी मिरवणुकीने झाली.
यानिमित्त जैन मंदिर मध्ये भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी सामूहिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मंदिरावर करण्यात आलेली नेत्रदीपक विद्युत रोषणाई सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या दशलक्षण धर्म पर्वा मध्ये दररोज जैन मंदिरामध्ये सकाळी महाभिषेक, विश्र्वशांती साठी महाशांती धारा, दशलक्षण पर्व पूजन, सायंकाळी मंगल आरती व त्यानंतर सांगानेर ( राजस्थान) येथील अवनीश शास्त्री यांचे दररोज दशधर्मावर प्रवचन इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नित्यनियमाने बारा दिवस आयोजन करण्यात आले. या दशलक्षण धर्मपर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन आणि उत्तम ब्रह्मचर्य दशलक्षणांची पूजा करण्यात आली. दिगंबर जैन समाजात या दशलक्षण धर्म पर्व काळात उपवास, स्वाध्याय, तप, त्याग आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाले. रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी जैन समाजातील विविध लहान मुलांचे तसेच पाठशाळेतील मुलांचे विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा गौरव करण्यात आला.
बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावली निमित्ताने दशलक्षण समाप्ती भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याने झाली. चांदीच्या पालखी मध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. १० दिवस निरंकार उपवास केलेले दिनेश गणेशवाडे, प्रीती पाटील तर पंचमेरूचे ५ उपवास केलेले ज्योती शहा व वासंती देशमाने यांची जैन धर्म प्रभावानेसाठी बग्गी रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंगेश ब्रास बँड यांचे सुमधुर बँड वादनाने जैन युवक युवतींनी गरबा नृत्य करीत आनंद लुटला.
त्यानंतर दहा दिवस निरंकार उपवास केलेल्या व्रतींचा पारणे कार्यक्रम मंदिरच्या स्वाध्याय हॉल मध्ये संपन्न झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान महावीर मंडळ व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, उदय लेंगडे, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, ज्योती बुरसे, शोभा पोकळे, प्रीतम मेहता, प्रकाश कुडचे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदूम आदी विश्वस्त उपस्थित होते.
टिप्पण्या