*शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, आता माझ्या आया, बहिणी व भावांनो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*
शासनाच्या विविध योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उर्वरित कामे देखील करण्याची धमक मी व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात आहे. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार ४९५ कोटी ३४ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे माझ्या आया- बहिणी, भावांनो तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने जन सन्मान यात्रेच्या निमित्त इंदापूर बाजार समितीच्या आवारात आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. तत्पूर्वी अजितदादा पवार यांनी शहर दैवत इंद्रेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, सुरेश घुले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, नवनाथ रुपनवर, सचिन सपकळ, सचिन बोगावत, विधीज्ञ महेश देवकाते, डॉ. शशिकांत तरंगे, वसंतराव मालुंजकर, विठ्ठलराव ननवरे, धनंजय बाब्रस, श्रीधर बाब्रस, अमर गाडे, अनिकेत वाघ, अविनाश भोईटे, दिलीप वाघमारे, वासिम बागवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित दादा पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे सूतोवाच केल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
अजितदादा पवार पुढे म्हणाले, राज्य अर्थ संकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने साठी तरतूद केली आहे. लाडकी बहीण योजने पाठोपाठ लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण करण्यात आले आहे. मात्र निवडणुका डोळ्या समोर ठेवून या योजना सुरू करण्यात आल्याची टीका विरोधक करत आहेत. सर्व योजनांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून ज्या ठिकाणी मी जातो, त्या त्या ठिकाणी भगिनी माय माऊली माझ्या दोन्ही हातात राख्या बांधत आहेत असे म्हणत अजितदादा नी दोन्ही हात उंचावून आपल्या हातातील बहिणीचे प्रेम सर्वांना दाखवताच टाळ्यांचा कडकडाट झाला. लाडकी बहीण योजनेचे सव्वा कोटी महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत. आम्ही तुमच्या साठी लढत आहे मात्र तुम्ही कपडे सांभाळण्याचे काम व्यवस्थित करा नाही तर असे म्हणत लोकसभा निवडणुकीकडे अजित दादा पवार यांनी आवर्जून लक्ष वेधताच सभेत हशा पिकला.
अजित पवार पुढे म्हणाले, इथून पुढे माझ्या भावाने लाईट बिल भरायचे नाही. तीन पाच व सात अश्वशक्ती क्षमतेच्या शेती पंपांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. आपणा सर्वांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तुमच्या घरापर्यंत सर्व योजना आणतो. मात्र तुमचे सहकार्य असू द्या! पाठिंबा असू द्या! असे आवाहन अजितदादा पवार यांनी शेवटी केले.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षात पाच हजार कोटी रुपयांचा न भूतो न भविष्यती असा निधी अजितदादांच्या माध्यमा तून आणला आहे. मी माझ्या कुटुंबाला वेळही देऊ शकत नाही तरी देखील विरोधक माझ्या रस्त्यात काटे आणि काचा टाकतात. मला नेहमी त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आता आम्हाला विकास निधी नको मात्र आता २२ गावचा बारमाही पाणी प्रश्न सोडवला पाहिजे, खडकवासल्याचे आवर्तन मिळाले पाहिजे, उजनी धरणा मध्ये बुडीत बंधारे झाले पाहिजेत या स्वरूपाच्या आमच्या मागण्या असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
चौकट- कोल्हापूरच्या घटनेवर अजितदादा पवार यांनी दिली कडक प्रतिक्रिया.
चिमुरडी मुलगी रुसून घराबाहेर पडली आणि मामाने डाव साधला. २४ तासात पोलीसांनी कारवाई केली. अशा विकृत लोकांचा कायम चा बंदोबस्त केला पाहिजे. त्यांनी पुन्हा अशी कृत्य करता कामा नये असे अजित पवार म्हणाले.
या जन सन्मान यात्रेसाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र अजितदादा यांचे नेहमी होणारे आक्रमक, दमदार भाषण झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना दादा सिंह होते मात्र महायुती मध्ये गेल्यानंतर दादांची शेळी झाली असल्याची प्रतिक्रिया काही उपस्थितांनी दिली.
टिप्पण्या