*इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमा --- आप्पासाहेब जगदाळे तर गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन*
आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९३८ सालापासून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांचे मार्फत हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पवित्र कार्य करीत असतानाच हल्ली अशा घटना घडणे ही शोकांतीका आहे. सदर शालेय पोषण आहार योजनेमध्ये अपहार होणे हेच मुळात तालुक्यातील या संस्थेमध्ये शिकणाऱ्या गोर गरीब विद्यर्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. शासन विविध योजनांद्वारे शिक्षण तळागाळात पोहचवण्याचे काम करत असतानाच श्री.संजय सोरटे यासारखे मुख्याध्यापक आणि त्यांचे भ्रष्ट सहकारी त्यामध्ये पदाचा गैरवापर करत अडथळा आणताना दिसत आहे. सदर श्री.संजय सोरटे ह्यांच्या बद्दल बऱ्याच पालकांची तक्रार असल्याचे समजते. नुकत्याच चालू असलेल्या शालेय ॲडमिशन संदर्भात अत्यंत मुजोरीने बोलणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन संदर्भात आगाऊची प्रवेश शुल्काची मागणी करणे, बंगल्यावर जाऊन भेटा म्हणजे त्यांनी सांगितल्यास ॲडमिशन होईल या सारख्या बऱ्याच तक्रारी पालक बोलून दाखवत आहेत. ही संस्था प्रायव्हेट लि. असल्यासारखा कारभार सद्या चालू आहे. इतके सर्व होत असताना संस्थेमध्ये हा जो अनागोंदी कारभार हे मुख्याध्यापक महाशय करत असताना संस्थाचालक म्हणून अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ हे जाणिवपूर्वक याकडे कानाडोळा करत आहेत. तरी सदरील प्रकरण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे म्हणून याची गंभीर दखल घेऊन संबंधीतावर कडक कार्यवाही व्हावी आणि जो काही अपहार झाला आहे त्याची पाळेमुळे शोधून काढून कायदेशीर कठोर कार्यवाही करावी. सदर निःष्पक्ष चौकशी होई पर्यंत संस्थेवर प्रशासक नेमावा अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी इंदापूर यांना दिले आहे.यावेळी प्रशांत उंबरे, शकिलभाई सय्यद, गणेश महाजन, अभिजीत अवघडे, अशोक चव्हाण, अक्षय सूर्यवंशी, सुनील तळेकर, प्रमोद राऊत, अमोल माने उपस्थित होते.
******************************************************
तालुक्याचे आदराचे स्थान असणारे स्वातंत्र्यसेनानी, शिक्षण महर्षी वैकुंठवासी नारायणदास रामदास शहा यांची त्यांनीच स्थापन केलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील काही जणांनी चालवलेली अवहेलना थांबवून शहा यांचा सन्मान त्यांना परत द्या. सन १९३८ ते १९५४ या कालावधीत वैकुंठवासी नारायणदास रामदास शहा हे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात शहा कुटुंबातील वैकुंठवासी गोकुळदास शहा, त्यांचे पुत्र मुकुंद शहा यांनी तालुका शिक्षण प्रसारक मंडळात पदे भूषवून जबाबदारीने कामकाज केले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने नारायणदास शहा व शहा कुटुंबाचे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण, शाळा महाविद्यालयाच्या उभारणीत असणारे योगदान पुसण्याचा, त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. शाळेच्या गणवेशाच्या बॅचवरील नारायणदास रामदास शहा यांचे नाव जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आले आहे. हा नारायणदास शहा यांचा व त्यांच्या शिक्षणविषयक कार्याचा सरळसरळ अवमान आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. यासंदर्भात कोणी आवाज उठवला नाही तर हे कुटील प्रयत्न सुरु राहून तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही सार्वभौम लोकशाहीच्या मार्गाने चालणारी संस्था एकाधिकारशाहीच्या अंमलाखाली येईल ही वस्तुस्थिती आहे. त्यास अटकाव व्हावा यासाठी गणवेशावरील बॅचमध्ये पूर्वीप्रमाणे नारायणदास शहा यांचा नामोल्लेख असणारा मजकूर टाकला जावा अशी आमची मागणी आहे. या मागणीचा विचार व्हावा. नारायणदास शहा यांना त्यांचा सन्मान परत मिळावा. मागणीचा विचार झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.
-- भरतशेठ शहा माजी उपनगराध्यक्ष इंदापूर
टिप्पण्या