मुख्य सामग्रीवर वगळा

*बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विजयी चौकार मारणार की सुनेत्रा पवार जॉइंट किलर ठरणार या कडे सर्वांचे लक्ष !*


इंदापूर, (डॉ.संदेश शहा यांचेकडून )
 बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी चौकार मारणार की  महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार जॉइंट किलर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांसह सर्व म्हणजे ३८ उमेदवारांचे भवितव्य कुलूपबंद झाले असून दिनांक ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. 
 देशाच्या राजकारणात बारामती लोकसभा मतदार संघाचा गेले सात दशकापासून राजकीय आदरयुक्त दबदबा असून ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या कर्तबगारी मुळे देशातील आदर्श मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. या मतदार संघावरील शरद पवार यांचे महत्त्व कायमचे संपविण्यासाठी भाजपने या निवडणुकी पूर्वी दोन वर्ष राजकीय रणनिती तयार करून काम सुरू केले. त्यांनी साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरत पवार कुटुंबातील एकच वादा कामात दादा असलेले तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले मात्र नंतर भाजपस पाठिंबा देवून पावन झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळाला लावून राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शरद पवार यांच्या विरोधात बंड करण्यास त्यांना भाग पाडले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन, कर्जतचे माजी आमदार राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व सहकाऱ्यांनी हा मतदार संघ पिंजून वातावरण निर्मिती केली. बी फॉर बारामती हे धोरण ठरवून त्यांनी ऑपरेशन लोटस सुरू केले. या मतदार संघातील चार विधान सभा मतदार संघाच्या आमदारांचा तसेच इतर मान्यवरांचा महायुतीस असलेला पाठिंबा यामुळे कागदोपत्री सूनेत्रा पवार यांचे पारडे जड झाले. या निवडणुकीत एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकाच व्यासपीठावर आले. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीच्या धक्क्यातून सावरून दुर्दम्य विचार शक्तीने मात करत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा किल्ला रणझुंजार पद्धतीने लढवला. त्यामुळे या मतदारसंघावर नेमके वर्चस्व कोणाचे हे मतदान निकालानंतर स्पष्ट होणार आहे.  मतदान टक्केवारी वाढविण्यात आलेले अपयश सर्वांसाठीच आत्मचिंतन करायला लावणारे आहे. बारामतीत घटलेले मतदान तर इंदापूरात वाढलेले मतदान इंदापूरचे निवडणुकीतील महत्त्व अधोरेखित करते.
हा मतदार संघ खेचून घेण्यासाठी महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावली. शरद पवार यांचा संपूर्ण पराभव करून त्यांना मानणारी राष्ट्रवादी उखडून टाकणे, शरद पवार हा अतृप्त आत्मा असे वक्तव्य, शरद पवार यांनी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना काय दिले, गेल्या दहा वर्षात या मतदार संघात निधी न आल्याने निष्क्रिय खासदार, तीन वेळा निवडून आल्या नंतर मतदारांची असलेली नाराजी, बारामती येथे झालेला संपूर्ण विकास केवळ अजित पवार यांच्या मुळेच, सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाचे कार्य करणारे अजित पवार यांनी घेतलेली राजकीय विरोधी भूमिका तसेच अजित पवार हे बारामती मतदार संघ तसेच राज्याच्या विकासासाठी महायुतीत आले आदी मुद्द्यावर महायुतीने सुप्रिया सुळे यांना खिंडीत पकडुन शरद पवार यांना बारामतीत अडकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ही रणनिती फसली असल्याचे शरद पवार यांच्या राज्यातील सर्वदूर सभांमुळे दिसून आले आहे. त्यात त्यांनी या वयात केलेली राजकीय गोळा बेरीज महायुतीस निश्चित अडचणीत आणणारी आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी केलेल्या प्रचाराचा किती फायदा होणार हे काळच ठरविणार आहे.
इंदापूर येथील आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई दूध संघाचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने आदींनी महायुतीच्या प्रचाराची बाजू सांभाळली तर उद्योगपती श्रीनिवास पवार, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष तथा कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, विधीज्ञ तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, सविता व्होरा, शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी आदींनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. स्टार प्रचारक आमदार रोहित पवार यांच्या मलिदा गँग, गोटया खेळणार का ? या भाषणातील वक्तव्याने महायुतीच्या प्रचाराची हवा काढून घेतली. तर शरद पवार यांच्या इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांचे पाणी अडवणूक करण्याच्या भूमिकेमुळे दोन दिवसात भरणे यांस सरळ करण्याचा दिलेला इशारा यामुळे ही निवडणूक गाजली. दौंड चे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, वासुदेव काळे , खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, बारामतीचे आमदार अजित पवार, बाळासाहेब तावरे, चंद्रराव तावरे, पुण्यातील नगरसेवक युवराज बेलदरे यांनी प्रचाराचे रान उठविले तर महाविकास आघाडीचे वतीने भोर चे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर चे आमदार संजय जगताप, पुण्यातील नगरसेविका स्मिताताई कोंढरे, सुधीर कोंढरे आदींनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतिम टप्प्यात अत्यंत चुरशी ने पार पडली. 
 बारामती विधानसभेत सर्वाधिक म्हणजे ६९.४७ टक्के मतदान झाले. येथून ३ लाख ६९ हजार २१७ पैकी २ लाख ५६ हजार ५३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खडकवासला विधानसभेत सर्वाधिक म्हणजे २ लाख ७७ हजार ३९५ मतदारांनी मतदान केले आहे. दोन्ही मतदारसंघांत मिळून ५ लाख ३२ हजार ८९६ मतदारांनी केलेले मतदान निर्णायक ठरण्याचे संकेत आहेत.  ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार यांची असल्याचा प्रचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकाऱ्यांनी केला. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी निवडणूक असल्याचा प्रचार दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केला. यावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाचे पुस्तक तयार करून वयोश्री योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार 
संघापेक्षा जास्त काम केल्याचे दाखवून दिले. शरद पवार यांचा या मतदार संघात असणारा जादुई करिश्मा याचा फायदा सुप्रिया सुळे यांना निश्चित होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्याचे इंदापूर तालुक्यात असलेले सभासद, हितचिंतक याचा देखील फायदा सुप्रिया सुळे यांना होणार आहे. त्यातच मतदार, शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात   घेतल्याने त्याचा देखील फायदा सुळे यांना होण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी बारामतीत खोड म्हणजे शरद पवार यांच्या विचारांचा उमेदवार चालवायचा तर विधानसभेसाठी अजित पवार ही बारामती करांची मतदानाची पद्धत,  शरद पवार पंचवीस अजित पवार तयार करतील मात्र अजित पवार यांना एक शरद पवार तयार करता यायचा नाही अश्या बोलक्या प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केल्या आहेत तर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात 
शिरसोडी ते कुगाव या पुलासाठी ३८२ कोटी रुपये केवळ आठ दिवसात मंजूर, इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची गढी संवर्धन, प्रलंबित लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी मंजूर करून अजित पवार यांनी कामाचा धडाका देत इंदापूर व इतर विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासन दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा अगोदर झाल्याने त्यांनी मतदार संघात धूम धडाक्यात प्रचार केला तर सुनेत्रा पवार यांची उमेदवारी उशीरा जाहीर झाली असली तरी मतदार संघातील बहुतेक सहकारी कारखाने, बँका, संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती,  नगरपरिषद, दूध संघ यांच्यावर अजित पवार यांची पकड आहे. सुनेत्रा पवार यांनी भाषणे देखील मार्मिक केली. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली. मात्र मतदान न केल्यास   शेतीस पाणी देणार नाही, ऊस नेणार नाही, दूध स्वीकारले जाणार नाही असा नकारात्मक प्रचार, भरणे मामा यांची कार्यकर्त्यावर शिवी गाळीची व्हायरल झालेली क्लिप, यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती येथे झाली नसलेली सभा, सुनेत्रा पवार यांचे कमळ नसलेले चिन्ह या सुप्रिया सुळे यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघा तून हक्काची ताई विजयी होणार का मतदारसंघाच्या विकासासाठी वहिनी विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हायहोल्टेज मतदार संघात नणंद भावजय पैकी कोण विजयी होणार यांच्या पैजा लागल्या आहेत. या निवडणुकीत शरद पवार किंवा अजित पवार या दोघांपैकी एक पवार यांचा उमेदवार पडून राजकारणातून संपणार असल्याने दोन्ही पवारांच्या यापूर्वीच्या राजकारणामुळे त्रस्त झालेल्या राजकारण्यांनी पडद्यामागे एकत्र येत किंगमेकर म्हणून काम केले आहे. त्यामुळे या मतदार संघाचा राजकीय वारस कोण ठरणार यावर पुढील विधानसभा  निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. त्यामुळे नवीन समीकरणाकडे इच्छुक विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...