*शेतकरी कुटुंबातील सिमरन थोरात बनली देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर, देशातील युवतींसाठी ती बनली आयडॉल. मुलीच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी विकली तीन एकर जमीन*
इंदापूर,( डॉ. संदेश शहा यांचेकडून). स्वप्नांना प्रयत्नांची जोड असेल तर ती नक्कीच पूर्ण होतात याचा प्रत्यय वडापुरी ( ता. इंदापूर ) येथील सिमरन ब्रम्हदेव थोरात हिच्या गरुड भरारीवरून येत आहे. शेतकरी कुटुंबातील सिमरन थोरात देशातील पहिली जहाजा वरील महिला डेक ऑफिसर बनली असून ती देशा तील युवतींसाठी आयडॉल बनली आहे. वडापूरी ( ता. इंदापूर जिल्हा- पुणे ) येथे एका शेतकरी सामान्य आणि साध्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये झाले. बारावी नंतर तिने प्रवेश परीक्षा देवून पुण्यातील महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ( एमएएनटीई ) कॉलेज मध्ये सन २०१६ साली प्रवेश घेतला. एका साध्या छोट्या गावातून शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथे शिकण्याचे मोठे आव्हान सिमरन समोर होते. परंतु तिने कधीही हार न मानता मोठ्या आत्मविश्वासाने हे आव्हान पेलले. सन २०१९ साली तिची कॉलेज मधूनच व्हनकुवर कॅनडा येथील सिस्पन शिप मॅनेजमेंट या कंपनीत निवड झाली. तिने बीएसस्सी नॉटीकल सायन्स ही डिग्री घेतली. या कंपनी मध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. परंतु भारतातून पहिल्यांदाच सिमरन हिची निवड झाल्याने इतिहास घडला. तिच्या यशस्वी कामगिरी वरून नंतर अनेक भारतीय मुलींची निवड करण्यात आली. त्याचे श्रेय सिमरन ला जाते. तिने २०१९ साली पहिले जहाज ट्रेनी ( डेक कॅडेट ) म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तिने पुढची परीक्षा देऊन लायसेन्स मिळवले. त्यानंतर तिची भारतातील पहिली महिला नेव्हीगेटिंग ऑफिसर म्हणून सदर कंपनीत निवड झाली. आज ही कंपनी भारता तून अनेक मुलींची निवड करत आहे. सिमरन ने आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे.
सिमरन तिच्या यशाचे श्रेय वडील ब्रम्हदेव, आई आशा तसेच भाऊ शुभम यांना देते. त्यांनी सिमरन च्या स्वप्नांस पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनी तीन एकर जमीन विकून सिमरन चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्यामुळे सिमरन म्हणते, माझ्या कुटुंबाने मालमत्तेस महत्त्व न देता मला स्वावलंबी व आत्म निर्भर करण्यासाठी मदत केली, त्याचा सार्थ अभिमान आहे. सिमरन व तिचा भाऊ शुभम हे दोघेही मर्चन्ट नेव्ही मध्ये ऑफिसर आहेत. प्रॉपर्टी चा विचार न करता, वेळ प्रसंगी प्रॉपर्टी विकून आई वडील यांनी घडविले. असे आई वडील लाभले यांचे परम भाग्य आहे. सगळ्यांना असे आई वडील मिळाले तर कोणीही मुलगा अथवा मुलगी अशिक्षित राहणार नाही अशी प्रतिक्रिया सिमरन हिने दिली आहे.
टिप्पण्या