०५ सप्टेंबर ऐवजी महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म दिन ११ एप्रिल हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा करावा -पै.अशोकराव देवकर
इंदापुर:-
महात्मा जोतीराव फुले. पुणे येथिल पहीली मुलींची शाळा सुरू करून बहुजन समाजातील घरात शिक्षणाची ज्ञानज्योत पेटविण्याचे काम करणारे पहीले शिक्षक म्हणजेच महात्मा फुले. काही सामाजिक संघटना महात्मा जोतिबा फुलेंच्या नावाने खरा शिक्षकदिन साजरा करताना दिसतात पण ते आजही आमच्या बहुजन समाजाला समजले नाही हीच खुप मोठी शोकांतिका आहे.आसे मत पै.अशोकराव देवकर यांनी व्यक्त केले ते म्हणाले की,महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. शाळेत शिकत असताना त्यांनी पाच-सहा वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती त्यामुळे ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले आहे. तर राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ साली झाला. तर महात्मा फुलेंनी राधाकृष्णन यांच्या जन्माच्या ४० वर्षापूर्वी म्हणजेच ०१ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स. १८५२ मध्ये शाळा स्थापन केली होती तर मग शिक्षकदिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा कसा होतो ? हा प्रश्न आमच्या तरुणांना पडत का नाही. राधाकृष्णन यांनी उभ्या आयुष्यात एकही शाळा सुरू केली नाही. पण त्यांच्या जन्मापुर्वी केवळ चार वर्षात महात्मा फुलेंनी २० शाळा सुरू करून विद्यादानाचे मोफतकार्य केले होते. राधाकृष्णन यांनी विद्यावेतन घेऊन एकाही बहुजनांच्या मुलांना शिकविल्याचा पुरावा नाही तर मग शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा करायचा उद्देश काय ? हा प्रश्न बहुजन समाजातील तरुणांना पडला पाहीजे पण त्यांच्या हा प्रश्नच पडत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. जोतीरावांनी आपली पत्नी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीमाई फुले. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. महात्मा जोतिबा फुले यांचे विचार विज्ञानवादी, प्रयत्रवादी होते त्यांनी अनिष्ट प्रथा, चालीरिती, स्वर्ग व नरक या काल्पनिक संकल्पना त्यांना मान्य नव्हत्या महात्मा फुलेंनी 'चूल आणि मुल' या धर्मव्यवस्थेवर आघात करून स्वतःच्या पत्ती सावित्रीमाईंना शिक्षण देऊन स्त्रियांसाठी देशात ०१ जानेवारी १८४८ रोजी सर्वप्रथम विद्यादानाला सुरुवात केली
महात्मा जोतिबा फुलेंचे चारित्र्य सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ व तेजस्वी आणि आदर्श घेण्यासारखे होते. त्यांनी तथागत गौतम बुद्ध, महासम्राट बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान मानून प्रबोधनास सुरुवात केली महात्मा जोतिबा फुलेंना बहुजन समाजाच्या गरीबीची तळमळ होती म्हणून तर त्यांनी 'गुलामगिरी, शेतक-याचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म तसेच देशातील पहिले नाटक तृतीय रत्र लिहिले. फुलेंच्या साहित्यामुळे पुरोगामी विचारांची विजे पेरली गेली त्यामुळे याच प्रेरणेतून अनेक संघटना निर्माण झाल्या महात्मा जोतिबा फुलेंनी हंटर कमिशन आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करा म्हणून इंग्रजांना निवेदन दिले. महात्मा जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज संस्थापक, शिवजयंतीचे जनक, शेतकरी, कामगार, नाभिक यांच्या संघटना स्थापन करून सार्वजनिक कार्यास सुरूवात केली त्यामुळे त्यांच्या वाट्याला पुरस्कार नव्हे तर तिरस्कार प्राप्त झाला; परंतू जोतिवा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना १८८८ मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथिल समेत रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा जोतिबा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.आज कोणालाही भेटणा-या भारतरत्न पुरस्कारापेक्षा किती तरी पटीने महात्मा ही पदवी श्रेष्ठ आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे एक उत्तम साहित्यिक, प्रतिभावंत संशोधक होते हे विश्वविख्यात तत्ववेत्ते आचार्य रजनीश यांनी त्यांच्या संदर्भ ज्यूं मछली बिन नीर (पृष्ठ क्र. १७०,१७१) या पुस्तकात लिहिले आहे. तसेच राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध होते, असे त्यांचे चिरंजीव डॉ. सर्वपल्ली गोपाल सांगतात.आज जगभर मुक्त विद्यापीठे सुरू झाली आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विद्यापिठातून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक विचारांचे एक गोड फळ आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण मुक्त शिक्षणाची संकल्पना ही महात्मा जोतिबा फुले यांचीच आहे.सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांचा महात्मा फुलेंचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले आहेत. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. त्यांनी आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केलेला आहे. तसेच 'अस्पृश्यांची कैफियत' हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे. महात्मा जोतिबा फुले यांचा मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाला.
तसेच सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. त्यामुळे आज आमच्या बहुजन समाजातील लोकांनी शिक्षकांनी शाळेत, तरुण तरुणींनी गावागावात ०५ सप्टेंबर ऐवजी महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म दिन ११ एप्रिल हा खरा शिक्षकदिन म्हणून साजरा करावा लागेल. तेव्हाच ख-या अर्थाने महात्मा जोतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना हे खरे अभिवादन ठरेल. आसे पै.अशोकराव देवकर यांनी व्यक्त केले.
म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामी शासनाने या वस्तुस्थितीची जाणीव ठेवून महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म दिन ११ एप्रिल शिक्षक दिन जाहीर करावा अन्यथा दि. ०१/०४/२०२४ रोजी पासून आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने "आझाद मैदान मुंबई" धरणे आंदोलन करणार आसे पै.अशोकराव देवकर यांनी सांगितले.
टिप्पण्या