भिडेंच्या कार्यक्रमास इंदापूरातून विविध संघटनांचा विरोध,
इंदापूर : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवधर्म फाउंडेशन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.२५) इंदापूर नगरपालिकेसमोर करण्यात आले आहे. भिडे नेहमीच वाद विवादित व सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्य करत असतात म्हणून या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी शिव,फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर, तहसीलदार श्रीकांत पाटील व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना देण्यात आले आहे.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी अद्याप पर्यंत दोन मन सिंहासनासाठी जो निधी जमा केला आहे. त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा हिशोब बहुजन समाजासमोर दिलेला नाही. पोलीस प्रशासनाने या संदर्भातील सर्व संबंधित कागदपत्रे ताब्यात घ्यावी व त्याचा सर्व कायदेशीर हिशोब बहुजन समाजासमोर मांडावा.
प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर सदर कार्यक्रमास शिव, फुले, शाहू,आंबेडकर चळवतील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कार्यक्रमाचे संयोजक आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील. हा कार्यक्रम इंदापूर नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घेऊन विषारी मत व्यक्त करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेच्या वक्तव्याने पुतळ्याच्या संदर्भात अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले असून परवानगी नाकारण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच मनोहर कुलकर्णी यांची पार्श्वभूमी पाहता हा व्यक्ती चितावणीखोर भाषणे देऊन समाजात अशांतता निर्माण करतो. इंदापूर शहरात आजपर्यंत सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे. ते वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र चालू आहे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
टिप्पण्या