इंदापूर :- तालुक्याचे आधारवड, कल्पतरू नेतृत्व असलेले ज्येष्ठ गांधीवादी नेते गोकुळ दास शहा उर्फ भाई ( वय ८७ ) हे दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ६.१५ मिनिटांनी पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे इंदापूर शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पूर्वी इंदापूर व आता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष तसेच सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. श्री नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सलग तीस वर्ष हजारो हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. काही अपंगाना त्यांनी जयपूर फूट दिले तर काही लोकांच्या टॉन्सिल व महिलांच्या शस्त्रक्रिया ट्रस्टच्या माध्यमातून मोफत केल्या. त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर येथे आणण्यात तसेच सोहळ्याची सेवा करण्यात ते नेहमी आघाडीवर असत. त्यांच्यावर स्वातंत्र्यसैनिक स्व. नारायणदास रामदास शहा शेठ यांचे संस्कार होते. त्यामुळे तालुक्यात शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, व्यापार, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना दैनिक सकाळ माध्यम समूह तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या आर्थिक शिस्तीमुळे कर्मयोगी कारखान्याने सलग तीन वर्ष सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवला होता. स्व. शंकरराव पाटील हे कारखान्यात आर्थिक व्यवस्थापनामध्ये त्यांचा शब्द अंतिम मानत असत. यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व पटते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूनबाई अंकिता मुकुंद शहा या इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा बनल्या. त्यांनी नगर परिषदेस स्वच्छता अभियानात सलग चार वर्ष राष्ट्रीय पातळीवर पोहचवले. त्यांच्या कार्याचे संस्कार घेवून त्यांचे चिरंजीव मुकुंद शहा यांनी कर्मयोगी कारखान्याचे संचालक तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून लक्षवेधी कामगिरी केली तर पुतणे भरत शहा यांनी त्यांचा आदर्श घेवून इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून चांगले योगदान दिले तर इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून चांगले योगदान देत आहेत. नातू निनाद हा अमेरिकेत उद्योजक म्हणून तर अंगद हा शेती पूरक उद्योजक म्हणून पुढे येत आहे. त्यांच्या निधनामुळे शहर व तालुक्यातील सच्चा व परखड नेता हरपला, बळीराजाचा आधार गेला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, इंदापूर जिल्हा पुणे.
टिप्पण्या