इंदापूर येथील रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,
इंदापूर:-महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित केला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून, सक्तीच्या वीज बिल वसुलीसाठी शेतकर्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. इंदापूर तालुक्यात वीजे अभावी शेती पिके जळून चालल्याने शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ चालू करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 8 ) सकाळी 10.30 वा. रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
या आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मंत्र्यांकडून वीज तोडण्याचे आदेश दिले जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज द्या म्हणणारेच सध्या सत्तेवर आहेत, तेच आता बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने खंडित करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन होणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करणे, आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असते. मात्र शेतकर्यांना खिंडीत गाठून, पिके जाळून व शेतकऱ्यांचे नाक-तोंड दाबून सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार शेतीपंपांची वीज बिल वसुली जबरदस्तीने कोणताही नियम न पाळता करीत आहे हे निषेधार्ह आहे.
इंदापूर तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये शेतीचा वीजपुरवठा सुरू आहे, मग इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांचा वीज तोडणी मोहिमेला पाठिंबा आहे. त्यामुळे ते वीज पुरवठा सुरु व्हावा, संदर्भात एकही शब्द बोलत नाहीत, मुग गिळून गप्प आहेत. महावितरणने शेतकऱ्यांना दिलेली बिले अव्वाच्या सव्वा आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून आलेली आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित केल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण आहे, याची जाणीव आता त्रस्त शेतकऱ्यांना झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
इंदापूर तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी होणाऱ्या इंदापूर येथील रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे.
* चौकट :-
फडणवीस सरकारने एकदाही वीज तोडली नाही- हर्षवर्धन पाटील
------------------------------------------
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राज्य सरकारने 5 वर्षे सत्तेवर असताना शेतकऱ्यांची एकदाही वीज तोडली नाही. उलट सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे ठरवून प्रत्येकी तीन ते चार महिन्याला अडचणीतील शेतकऱ्यांना खिंडीत गाठून सक्तीने व अन्यायकारक पद्धतीने वीज बिलाची वसुली करीत आहे. शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय भाजप थांबवेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
______________________________
टिप्पण्या