इंदापूर :
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे असलेल्या बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीस देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, मौजे रांझणी
ता. माढा जि. सोलापूर येथील बौद्धसमाजातील भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. या भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या १५० आहे. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहसाठी त्यांना कसण्यास द्यावी. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या वहिवाटी सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून अडचण येताना दिसून येत नाही परंतु आमच्या भूमिहीन बांधवांना जातीवादी प्रशासनाकडून वहिवाटीस मज्जाव केला जात आहे व गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे संजय सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्राच्या आराखड्याचे काम सुरु आहे. या आराखड्यामधून मौजे रांझणी जमीन गट क्र. ५५/५६ वगळून आराखडा तयार करुन आपल्या स्तरावर या बौद्ध समाजातील भूमीहीन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि प्रशासना मधील संबंधित जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी सोनवणे यांनी केली आहे.
तरी प्रशासनाने तात्काळ बौद्ध समाजातील भूमीहीन शेतकऱ्यांना दि. २०/०९/२०२१ पर्यंत उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्र या आराखड्या मधून वगळून त्यांना त्या जमिनी कसण्यासाठी देण्यात यावी अन्यथा दि.२१ आॅगस्टपासून कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्या गेट समोर सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व शेतकऱ्यांसमवेत बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा संजय सोनवणे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
टिप्पण्या