खाद्य तेलाच्या दरात घट झाल्याने,पुन्हा जेवणात चमचमीत पदार्थ येणार,आसल्याने गृहीणी खुष
इंदापूर:- कोरोना काळात खाद्यतेलाच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना बसत होती. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाची आवक वाढल्याने खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. इंदापूर शहरात १६० रुपये प्रतिकिलो मिळणारे सोयाबीन तेल आता १४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे.
कोरोनामुळे जागितक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलाची आवक कमी होत गेली होती. त्यामुळे देशभरात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीही चांगल्याच भडकल्या होत्या. अगोदरच कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. कामगारांच्या हाताचे काम गेले. शासनाने जाहीर केलेली मदतही वेळेत पोहोचली नसल्याने घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती
आता निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अशात खाद्यतेलाच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. जेवणातून चमचमीत पदार्थ गायब झाले होते. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारात खाद्यतेलाची आवक होत असल्याने खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचे बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. इंदापूर बाजारपेठेत करडई खाद्यतेलवगळता इतर खाद्यतेलांच्या किमतीमध्ये जवळपास १८ ते २० रुपयांपर्यंत घट झाल्याचे किराणा दुकानदार दिपकराव खिलारे यांनी सांगितले.
गृहिणींचे बजेट कोलमडले
खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. जेवणातून तळीव पदार्थ गायब झाले होते. अर्धे बजेट खाद्यतेल खरेदीत खर्च होत असल्याने चांगलीच काटकसर करावी लागत आहे. आता किंचित घट झाली असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
पूर्वी करडईचे उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढे करडईचे तेल घाण्यावरून काढून आणले जात होते. मात्र, करडईचे पीक काढण्यासाठी फारसे मजूर मिळत नसल्याने आता पीक घेणे कमी झाले आहे. त्यामुळे आता विकतचे तेल आणावे लागत आहे.
- हमिदभाई आतार
सूर्यफूल, शेंगदाणा, करडईचे पीक चांगले येत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी वर्षभर पुरेल एवढे खाद्यतेल राहात होते. आता सर्व शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे विकतचे तेल आणावे लागत आहे.
- प्रदीप (आण्णा) पवार
खाद्यतेलाचे आधीचे व आताचे दर
सोयाबीन १६० - १४०
सूर्यफूल - १८० - १६०
शेंगदाणा १८० - १६०
पामतेल १५० - १३०
करडई २०० - २००
टिप्पण्या