इंदापूर :एकीकडे तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातीलच गोखळी ग्रामस्थांचे आरोग्य मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहे, प्रशासनाने तात्काळ रिक्त असलेले आशा सेविकेचे पद भरुन नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी गोखळी ग्रामपंचायतीच्या सदस्या नंदाबाई भानुदास चितळकर यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गोखळी गावचे ग्रामसेवक एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्र गोखळी गावापासून १७ किलोमीटर लांब अंतरावर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली समिती कोणत्याही प्रकारचे काम करत नाही.अशा परिस्थितीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
शासनाने नेमलेली एकमेव आशा सेविका कोणतेही काम करत नाही. अगदी एखाद्या नागरिकाला थंडी, ताप, कणकणी अथवा जुलाब होत असल्यास प्राथमिक उपचाराचे औषधसुद्धा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तर दुसरी आशा सेविका सरपंच असल्यामुळे आशा सेविका पदावरुन सन २०१९ मध्येच त्यांना बडतर्फी करण्यात आले आहे. त्यामुळे गोखळी गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे आरोग्याची सेवा उपलब्ध नाहीत, उपलब्ध आशा सेविका कोणतेही काम करत नसल्याने चितळकरवस्ती, तरंगेवस्ती, खरातवस्ती, पारेकर-फडतरे वस्ती, अभंगवस्ती, गोफणेवस्ती, झगडेवस्ती येथील नागरिकांचे आरोग्य हे रामभरोसे आहे.
गोखळी गावच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या ही सध्या निरंक असली तरी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनासाठी तसेच दैनंदिन तपासणीसाठी कोणीही नसल्याने नागरिकांच्या आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढलेला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने रिक्त जागेबाबत पात्र अर्जदारांचे अर्ज मागवून आशा सेविकेचे पद तात्काळ भरुन नागरिकांच्या आरोग्यसेवेची व्यवस्था करावी व निष्क्रिय आशा सेविकेच्या कामाची सक्षम पथकाद्वारे चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
टिप्पण्या