इंदापूर :
औरंगाबाद (मराठवाडा) विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांनी वेब पोर्टल बाबत केवळ सवंग प्रसिद्धीसाठी बेजबाबदार वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीकरीता इंदापूर (पुणे) येथील वेब पोर्टल संपादक, पत्रकारांनी इंदापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महा डिजिटल मीडिया असोसिएशन या डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या राज्यातील पहिल्या स्वः नियामक संस्थेचे पदाधिकारी संपादक धनंजय कळमकर, सुरेश जकाते, पत्रकार काकासाहेब मांढरे, कैलास पवार, श्रेयश नलवडे, जितेंद्र जाधव, इम्तियाज मुलाणी, सिद्धार्थ मखरे,विजय शिंदे आदी वेब पोर्टल व युट्यूब चॅनेल चे पत्रकार उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे औरंगाबाद (मराठवाडा) विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी बीड येथे व्याख्यानमालेत “ यूट्यूब आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यताप्राप्त पत्रकारिता नाही, अनेक प्रकरणात कार्यवाही करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे, हे मानांकित जर्नालिझम नाही ” असे वक्तव्य केले.
वरील वक्तव्य देत असताना गणेश रामदासी यांनी भारताचे महामहीम राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केलेली अधिसूचना दि. ९ नोव्हेंबर २०२० चा अवमान केला असून डिजिटल मीडिया प्रकरणी कोणतीही माहिती नसताना केवळ सवंग प्रसिध्दीसाठी बेजबाबदार वक्तव्य करुन अकार्यक्षम अधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे. हे त्यांचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तीला अनुसरुन नाही. महामहीम राष्ट्रपती यांच्या अधिसूचनेविरूध्द बोलण्याची ही पहिली घटना असावी.
देशातील विरोधी पक्ष सुध्दा महामहीम राष्ट्रपती यांच्या द्वारे काढलेल्या अधिसूचनेचा सन्मान करतात. किंबहूना तो करावाच लागतो. कायद्याने हे सर्व नागरिकांना बंधनकारक असते. मात्र गणेश रामदासी यांच्यासारखे बेजबाबदार अधिकारी स्वत:ला कायदे मंडळापेक्षाही सर्वश्रेष्ठ समजू लागले आहेत, असे यावरुन दिसून येते.
कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल माध्यमांनी अतिशय दर्जेदार कामगिरी केली असून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम न थकता, कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता केले आहे. महाराष्ट्र शासन वगळता इतर राज्यांमध्ये डिजिटल मीडिया पत्रकारांना इतर मीडियाच्या पत्रकारांप्रमाणेच सर्व सुविधा मिळतात. शासकीय जाहिराती, अधिस्विकृती सारखे लाभ डिजिटल मीडिया पत्रकारांना दिले जातात.
महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण डिजिटल मीडिया पत्रकारितेकडे उज्ज्वल भविष्याची आस लावून बसलेले आहेत. जीवाची पर्वा न करता अनेक प्रसंगी डिजिटल मीडिया पत्रकारांनी बहुमोल काम केले आहे. डिजिटल मीडिया पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील अनेक गुणवंत पत्रकारांनी आर्थिक गुंतवणूक करुन पत्रकारितेचा नवीन आयाम, आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे. गणेश रामदासी यांनी “डिजिटल मीडिया अनधिकृत आहे” असे वक्तव्य करुन अनेक युवा पत्रकारांच्या मनामध्ये नैराश्य व नकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
महामहीम राष्ट्रपती यांच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये वक्तव्य करणारे अधिकारी गणेश रामदासी यांची याप्रकरणी विभागीय चौकशी, निलंबन हे कार्यालयीन सोपस्कर न करता त्यांना सेवेतून थेट बडतर्फ करावे अशी मागणी इंदापूर वेब पोर्टल व युट्यूब चॅनेल च्या संपादक, पत्रकारांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
टिप्पण्या