इंदापूरः तालुक्यात 38 ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवादपणे सत्ता आली आहे, तर 4 ग्रामपंचायती संमिश्र आहेत. भिगवण, वालचंदनगर आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपने एकतर्फी सत्ता मिळवली आहे. या निवडणूक निकालातून इंदापूर तालुक्यावरील भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निकालानंतर बोलताना सॊमवारी दिली.
इंदापूर तालुक्यातील जनता भाजपच्या पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. इंदापूरच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेने मतपेटीतून दिलेला हा स्पष्ट कौल असल्याचे प्रतिपादनही भाजप नेते पाटील यांनी केले.
या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपच्या ताब्यात तालुक्यातील सुमारे 70 टक्के ग्रामपंचायती आल्या आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे आदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी, गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयासाठी परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
नीरा नरसिंहपूर, गोंदी,ओझरे, पिठेवाडी, भोडणी, भांडगाव, कचरवाडी( बा.), टणू, सरडेवाडी, बाभुळगाव,गलांडवाडी नं.1, गलांडवाडी नं.2, वरकुटे खुर्द, जाधववाडी, रेडा, सराफवाडी, पिटकेश्वर, निमसाखर, भिगवण, तक्रारवाडी, पोंधवडी, शेटफळगढे, अकोले, निरगुडे, निंबोडी, पिंपळे, व्याहळी, गोतोंडी, दगडवाडी, निरवांगी, तावशी, भादलवाडी, वालचंदनगर, कळंब,सपकळवाडी, लोणी देवकर,बळपुडी, भावडी, चांडगाव या 38 ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत.
दरम्यान,या विजयी उमेदवारांचे हर्षवर्धन पाटील यांचेसह आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार आदींनी अभिनंदन केले आहे.
________________________________
टिप्पण्या