इंदापूर: भारतासाठी 26 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस असून जगाला हेवा वाटेल अशी भारतीय राज्यघटना असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (विज्ञान विभाग) येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, विकास मोरे, प्रशांत शेटे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना लिहिण्याकरीता त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. जगाला हेवा वाटेल अशाप्रकारची राज्यघटना ही भारतासारख्या खंडप्राय लोकशाही देशाला प्राप्त झाली आहे. स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. आज मोठी युवाशक्ती निर्माण होत आहे. जगात अनेक पुढारलेले राष्ट्र आहेत मात्र भारत हा असा एक देश आहे की या राष्ट्राने कोरोना लसीची यशस्वी निर्मिती केली आहे याचा सार्थ अभिमान आहे.'
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले.
सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक केशव बनसोडे यांनी मानले.
टिप्पण्या