इंदापूर :- प्रतिनिधी (२८ नोव्हेंबर २०२०) येथील भिमाई आश्रमशाळेत समाजसुधारक ,विचारवंत ,मराठी लेखक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे (तात्या) व श्री. संतोष शेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रत्नाकर मखरे म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे आपल्या बहुजन समाजाचा व महिलांचा उत्कर्ष झाला असून त्यांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळते, असे सांगत मखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सावित्रीबाई ,महात्मा फुले यांनी त्याकाळी समाज सुधारणा करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, समाजाला दिशा दाखवली.त्यांचे कार्य मोठे असून आजच्या तरुणांनी व प्रत्येकाने त्यांच्या कामाचा अभ्यास करावा. त्यांच्या विचाराने आपल्या बहुजन समाजाने शैक्षणिक व आर्थिक प्रगती केली आहे. त्यांचे विचार व कार्य आपल्याला प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असे मखरे यांनी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सत्यशोधक नावाच्या समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी महात्मा फुलेंनी केली. आणि महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने सन १८९० साली त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ फुलेंनी लिहिला. बहुजन समाजातील अज्ञान,दारिद्र्य पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. त्यांची सामाजिक परिस्थिती बदलण्याचा फुलेंनी प्रयत्न केला. पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.२८ नोव्हेंबर हा फुलेंचा स्मृतिदिन शिक्षकदिन म्हणून शासनाने सुरू करावा, असे आव्हान मखरे यांनी फुलेंना आदरांजली वाहताना राज्यकर्त्यांना केले आहे.
प्रास्ताविक करताना साहेबराव पवार म्हणाले की, ज्ञान ही एक शक्ती आहे. शिक्षण हे सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही समाजात पहावयास मिळतो आहे. विचार आणि आचार याबाबत महात्मा फुले आदर्श होत. पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात नूतन सृष्टी निर्माण केल्याची भावना मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास संस्थेतील प्राचार्या अनिता साळवे मॅडम सह सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपस्थितांनी खबरदारी घेतली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.
टिप्पण्या