शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
इंदापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन (दि.२२) रोजी शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड.राजेंद्र काळे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदेशानुसार व शिवसेना नेते खा.संजय राऊत, शिवसेना उपनेते तथा विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या सूचनेनुसार, शिवसेना बारामती लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवानजी उभे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरता रणनीती आखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
अॅड. राजेंद्र काळे म्हणाले, तालुक्यातील शिवसैनिकांनी आपापसातील मतभेद विसरुन कामाला लागावे. प्रत्येक गावोगावी जावून जनतेच्या अडी-अडचणी समजून घेवून त्या सोडवाव्यात. गाव तिथे शाखा उघडून पक्ष संघटन मजबूत करावे. अश्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकरता पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेणे, सभांचे आयोजन करणे, उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा. जो शिवसैनिक प्रामाणिकपणे पक्षाचे काम करेल त्यांनाच पक्षामध्ये जागा देण्यात येईल.पक्षाशी गद्दारी करणार्यास घरचा रस्ता दाखविण्यात येईल असा इशारा अॅड.काळे यांनी दिला.
यावेळी पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भिमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना पक्ष संघटना मजबूतीसाठी, गाव तिथे शाखा उघडण्यासाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी पक्षसंघटन वाढविण्याकरीता सभासद नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले.
या बैठकीला तालुका संघटक, तालुका समन्वयक, तालुका कार्यक्षेत्र प्रमुख, शहर प्रमुख, उपशहरप्रमुख, युवासेना, विद्यार्थी सेना, वाहतुक सेना, सहकार सेना व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख उपस्थित होते.
===============================
टिप्पण्या