इंदापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना म्हणजे दुधातील साखर आहे, असे गौरवोद्गार बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
(दि. २६ ) रोजी इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात महाविकास आघाडीचे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे,शिवसेनेचे शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख वसंतराव आरडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाने सरकार स्थापन केले. सरकार नऊ दिवस, 9 आठवडे, नऊ महिने चालेल अशी टीका टीकाकारांनी केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. असे सांगून खासदार सुळे पुढे म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्य सरकारने अतिशय चांगली अंमलबजावणी केली. संपूर्ण देशात सर्वात जास्त कोरोनाची रुग्णसंख्या होती. कारण यामध्ये कसलीही लपावाछपीवी केली नव्हती. महाराष्ट्र सरकारच्या कामाची नोंद परदेशातही घेण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना पक्ष म्हणजे दुधातील साखर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'हे अभियान सुरु केले. पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
विरोधी पक्षाचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सरकार कधी पडणार याचे स्वप्न त्यांना पडतात. मात्र सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. आगामी काळात हे सरकार असेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदार संघातील उमेदवारांसाठी एक एक मत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद मतदार संघ निहाय नियोजन करुन मतदान केंद्रावर मतदान आणावे. महाविकास आघाडीचे सर्व पक्षाला बरोबर घेऊन हे नियोजन करावे. बावडा गटांमध्ये सर्वात जास्त मतदान असल्याने नियोजन करुन मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार संघातील उमेदवारांसाठी मतदान घडवून आणायचे आहे. इंदापूर शहर, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानुसार मतदारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान इंदापूर तालुक्यात आहे. कार्यकर्त्यांनी गांभीर्याने या निवडणुकीचे काम केले पाहिजे असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी केले.
टिप्पण्या