इंदापूर:प्रतिनिधी दि.17/9/20
राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी चालू सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या दुधाचा खरेदीचा दर हा प्रति लिटर रू.23 ते 25 पर्यंत केला आहे.भाजपने दूध दरवाढीसाठी 2 वेळा राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दूध खरेदीच्या दरात वाढ केली आहे अन्यथा दूध संघांनी दुधाचे दर वाढविले नसते. शेतकऱ्यांच्या दुधास मिळालेली दरवाढ ही भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाचे यश आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दिली.
कोरोना व्हायरसच्या अडचणीच्या काळात दुग्ध व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार आहे.सर्व दूध संघांनी केलेल्या दरवाढीबाबत समाधान व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, दुधास रू.30 दर मिळावा या मागणीवरती भाजप ठाम असून,या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटरला 17 ते 18 रुपये एवढा कमी दर मिळत असल्याने दूध खरेदी दरात वाढ करावी,या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यांमध्ये दि.20 जुलै व 1 ऑगस्ट या दिवशी 2 वेळा दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले . इंदापूर येथे दि. 20 जुलै रोजी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांचेकडे तहसील कार्यालयामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे दुध दर वाढ मिळावी,
असे निवेदन दिले. त्या निवेदनात जर दूध दरवाढ केली नाहीतर दि. 1 ऑगस्ट 20 रोजी राज्यात प्रत्येक गावात भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दि.1 ऑगस्ट रोजी इंदापूर येथे तहसील कार्यालयाच्या गेट समोर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध वाढीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच इंदापूर तालुक्यातील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. भाजपच्या राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलनामुळे दूध दरवाढ निश्चितपणे मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना होती. अखेर 11 सप्टेंबर पासून सहकारी व खासगी दूध संघांनी प्रति लिटरला रू.23 ते 25 पर्यंत दूध खरेदीचा दर वाढविला आहे.
शासनाने दुधास प्रति लिटरला 30 रुपये दर द्यावा,अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी करावी, दुधास प्रतिलिटर 10 रू.अनुदान द्यावे,या भाजपच्या मागण्या आजही कायम आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
____________________________
टिप्पण्या